न्यूयॉर्क / वृत्तसंस्था
अमेरिकेतील महत्वाचे शहर न्यूयॉर्क येथे महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाची तोडफोड करण्यात आली आहे. हा पुतळा एका मंदिरासमोर स्थापन करण्यात आला होता. गेल्या दोन आठवडय़ांमधील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. प्रथम पुतळा पाडविण्यात आला आणि नंतर त्याचे तुकडे करण्यात आले.
15 ऑगस्टला भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्यानंतर 16 ऑगस्टला ही घटना घडली. न्यूयॉर्क येथील सघन लोकसंख्येच्या भागात श्री तुलसी मंदिरासमोर हा पुतळा स्थानापन्न करण्यात आला होता. सहा जणांच्या एका टोळक्याने पुतळा पाडविला. नंतर हातोडय़ाने तो फोडला आणि त्याच्या तुकडय़ांवर विद्वेषी लिखाण केले. आजूबाजूच्या रस्त्यावरही असे लिखाण करुन हे टोळके पसार झाले. पोलिस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
ही घटना सीसीटीव्हीवर नोंद झाली आहे. त्याच्याच आधारे पोलिस समाजकंटकांचा शोध घेत आहेत. ते एका पांढऱया मर्सिडिझ बेंझ आणि एका काळय़ा रंगाच्या कारमधून पळून जाताना आढळले आहेत. न्यूयॉर्क येथेच 3 ऑगस्टला आणखी एका गांधीपुतळय़ाची नासधूस करण्यात आली होती. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने या घटनेची गंभीर नोंद घेतली असून हल्ल्याचा निषेध केला आहे. दूतावासाने ही बाब स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीला आणून दिली असून जे कोणी या कृत्याला उत्तरदायी असतील त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी केली आहे.