महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
कोल्हापूर : महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ आता सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने सोमवारी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत महाराष्ट्र-कर्नाटक यांच्या सीमाभागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या तब्बल 865 गावातील मराठी भाषिक गावातील नागरिकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य लागू केली. यासंदर्भातील शासकीय निर्णय महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी जाहीर केला. सीमाभागातील मराठी भाषिकांकडून महाराष्ट्र शासनाकडे शैक्षणिक अभ्यासक्रम, शैक्षणिक सुविधा या मागण्यांबरोबरच आरोग्यविषयक मागणी करण्यात आली होती. त्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी 865 गावातील मराठी भाषिक नागरिकांकडून करण्यात आली. या मागणीकडेही महाराष्ट्र शासनाने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता सोमवारच्या महत्वपूर्ण निर्णयानंतर झाली आहे. या जन आरोग्य योजनेचा लाभ सीमाभागातील लाखो मराठी भाषिक नागरिकांना मिळणार आहे.
म. फुले जन आरोग्य योजनेसाठी असे आहेत निकष :
- भविष्यात म. फुले जनआरोग्य योजनेचे निकष अथवा इतर काही बदल झाले तर ते सीमाभागातील 865 गावांतील लाभार्थी कुटुंबांना लागू राहतील.
- योजनेच्या लाभासाठी कर्नाटक राज्यातील शिधापत्रिका (रेशनकार्ड) तपासली जाईल. व्यक्तीची ओळख आधार व्दारे व ते नसल्यासह 14 ओळखपत्राव्दारे तपासली जाईल.
- संबंधित नागरिकांना या योजनेतर्गंत प्रति कुटुंब/प्रतिवर्ष 1 लाख 50 हजार रकमेचे (मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रतिवर्ष 2 लाख 50 हजार) विमा संरक्षण रक्कम व 34 तज्ञ सेवांमधील 996 उपचारांचा लाभ मिळणार आहे.
- सीमाभागातील 865 गावातील कुटुंबांना महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, खासगी, अंगीकृत रूग्णालयासह बेळगावमधील के.एल.ई. हॉस्पिटल आणि पणजी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयामधून या आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंगीकृत असलेल्या 10000 रूग्णालया व्यतिरिक्त अतिरिक्त 140 रूग्णालये कर्नाटकला लागून असलेल्या महाराष्ट्र राज्यातील आठ जिह्यामध्ये अंगीकृत करण्यास व 10 मराठी भाषिक असणारी रुग्णालये महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, कलबुर्गी, बिदर या मराठी भाषिक जिल्ह्यात अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- अतिरिक्त 150 रूग्णालये अंगीकृत करण्यासाठी करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार विमां कंपनींबरोबर अतिरिक्त विमा हप्ता ठरविण्यात येणार आहे. लाभार्थी कुटुंबांना विमा दाव्याची रक्कम विमा कंपनीमार्फत आणि हमी तत्वावर राज्य आरोग्य हमी सोसायटीव्दारे दिली जाईल.
बेळगाव, कारवार, कलबुर्गी, बिदर जिल्ह्यातील मराठी भाषिकांना लाभ
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या बेळगाव, कारवार, कलबुर्गी व बिदर जिल्ह्यातील 865 गावातील मराठी भाषिकांना लाभ मिळणार आहे. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य गटातील कुटुंबे व अन्नपुर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये असणार आहे.