वृत्तसंस्था /नवी दिल्ली
1970 च्या दशकामध्ये भारतीय महिला क्रिकेट क्षेत्राच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे तसेच या क्रीडा प्रकाराचे जनक म्हणून ओळखले जाणारे महेंद्रकुमार शर्मा यांचे मंगळवारी वयाच्या 74 व्या वषी पुणे मुक्कामी निधन झाले.
भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी हिने महेंद्रकुमार शर्मा यांच्या निधनाची बातमी कळविली आहे. महेंद्रकुमार शर्मा हे अखिल भारतीय महिला क्रिकेट संघटनेचे सचिवही होते. त्यांनी सुरुवातीला पाच वर्षे हे सचिवपद सांभाळले होते. 1975 साली भारतामध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत महिला क्रिकेट संघातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यामध्ये महेंद्रकुमार शर्मा यांचा वाटा महत्त्वाचा होता. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा केला होता. 2006 नंतर भारतीय महिला क्रिकेट क्षेत्र बीसीसीआयच्या छत्राखाली आले. महेंद्रकुमार शर्मा यांच्या प्रयत्नांमुळेच भारताने 1978 साली पहिल्यांदा महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भरविली होती. त्यानंतर भारताने 1997 च्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भूषविले होते आणि त्या स्पर्धेत इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना कोलकात्याच्या ईडनगार्डन्स मैदानावर खेळविला गेला होता. 1976 साली बेंगळूरमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिला कसोटी सामना आयोजित करण्यामध्ये शर्मा यांचा वाटा महत्त्वाचा होता. क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शर्मा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.