प्रतिनिधी /बेळगाव
महिला विद्यालय हायस्कूलने शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केले. याचा उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला. महिला विद्यालय मंडळाचे अध्यक्ष भगवानदास कपाडिया, संस्थेचे विश्वस्त ऍड. अशोक पोतदार, शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आशा नेसरकर, मुख्याध्यापक व्ही. एन. पाटील व केतकी देसाई यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षिका नागण्णवर तसेच विद्यार्थिनींनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले. मुख्याध्यापक व्ही. एन. पाटील यांनी स्वागत व परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. केतकी देसाई, सहशिक्षिका शैला मत्तीकोप यांनी मनोगत व्यक्त केले.
ऍड. अशोक पोतदार यांनी मार्गदर्शन करताना शाळेचे संस्थापक धोंडो केशव कर्वे व संचालिका बनुबाई अहो यांनी शाळेसाठी घेतलेले कष्ट, मुलींच्या शिक्षणाची तळमळ सांगितली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि कार्याला साजेसा शतक महोत्सवाचा कार्यक्रम करूया, असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला सेपेटरी विवेक कुलकर्णी यांचे प्रोत्साहन मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अस्मिता देशपांडे यांनी केले, तर के. एन. पाटील यांनी आभार मानले.