बऱ्याच जणांना कुरळे केस आवडतात. काही जण क्लासी लुकसाठी केस कुरळे करून घेतात. पण हे केस दिसायला जरी सुंदर दिसत असले तरी त्यांची काळजी घेणे तितकचं कठीण आहे. कुरळ्या, सुंदर आणि मजबूत केसांसाठी काही खास टिप्स देणार आहोत.
कुरळ्या केसांमध्ये कोरडेपणाची समस्या जाणवते.यामुळे केसांचा गुंता जास्त होतो. त्यामुळे केस धुण्याआधी केसांना व्यवस्थित तेलाने मालिश करा. त्यामुळे तुमच्या केसांमधील कोरडेपणा निघून जाईल.
कुरळ्या केसांमध्ये अधिक गुंता होत असल्यामुळे केस विंचरताना ब्रश केसांमधून ओढू नका. कारण असं केल्यास, तुमचे केस तुटतात. अशा केसांमध्ये नेहमी कंगवा हलक्या हाताने फिरवा. तुम्हाला हवं तर कुरळे केस मऊ आणि मुलायम बनवण्यासाठी शॅम्पूनंतर कंडिशनर केसांना लावा. यामुळे तुमचे केस केवळ मुलायम होणार नाहीत तर अगदी सोप्या रितीने गुंता सुटेल आणि तुटणार पण नाहीत.
कुरळे केस धुतल्यानंतर टॉवेलने घट्ट बांधून ठेऊ नका.यामुळे केसांमध्ये गुंता वाढतो आणि केस तुटण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे अतिशय तलम असा टॉवेल तुम्ही कुरळे केस पुसण्यासाठी वापरा. कुरळे केस हळूवार पुसा.
कुरळ्या केसांचा गुंता हा खाली सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हळूहळू वरच्या बाजूचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करा.
कुरळे केस सुकवण्यासाठी सहसा ड्रायरचा वापर करू नका. कुरळ्या केसांमध्ये मुळातच ड्रायनेसची समस्या असते. अशावेळी तुम्ही ड्रायरचा वापर केल्यास केस अधिक कोरडे होतात.

