राज्यसभेत मागणी: खेळ, खेळाडूंना चालना देण्यासाठी क्रीडानिधीत वाढ करण्याचे आवाहन
कोल्हापूर प्रतिनिधी
उत्तेजक द्रव सेवनामुळे खेळाडूचे करिअर तर उद्धवस्त होते, पण खेळाचीही हानी होते. गेल्या काही वर्षांत अँटी डोपिंग कायदा असूनही डोपिंगचे प्रकार वाढत आहेत. त्याला केवळ खेळाडू नव्हे तर प्रशिक्षण व इतर घटकही जबाबदार आहेत. या सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने डोपिंगसंदर्भातील सर्वसमावेशक कायदा तयार करावा, अशी आग्रही मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. सध्या खेळ आणि खेळाडूंसाठी असणाऱया क्रीडानिधीतही वाढ करण्याची गरज असल्याकडेही खासदार महाडिक यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
2009 मध्ये नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (नाडा) अस्तित्वात आली. पण तरीही डोपिंग नियंत्रणासाठी ठोस कार्यक्रम किंवा कायदे नव्हते. आता राष्ट्रीय खेल समितीने डोपिंग विरोधी कायदा प्रस्तावित केला आहे. या कायद्यावर बुधवारी राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यान, खासदार महाडिक यांनी आपले पूर्ण समर्थन असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून आणि क्रीडा मंत्र्यांच्या विकासाच्या भुमिकेतून खेळाडूंना चालना मिळत आहे. खेलो इंडिया, साई सेंटर अशा उपक्रमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठा वाव मिळत आहे. पूर्वी क्रीडा क्षेत्रात आपल्या मुलांचे करिअर घडू शकत नाही, अशी पालकांची धारणा होती. मात्र गेल्या काही वर्षात भारतीय खेळाडूंना भरभक्कम मानधन मिळू लागले. पण दुर्दैवाने त्याच वेळी अनेक भारतीय खेळाडू डोपींग चाचणीमध्ये दोषी आढळत आहेत. 2019 मध्ये झालेल्या सर्व्हेक्षणानुसार सुमारे 225 भारतीय खेळाडू डोपींग चाचणीत दोषी ठरले. शरीर सौष्ठव, सायकलींग, ऍथलेटिक्स, वेटलिफ्टींग अशा क्रीडा प्रकारामध्ये प्रामुख्याने डोपींगचे प्रकार वाढले. त्याला केवळ खेळाडू जबाबदार नाहीत, तर त्यांचे प्रशिक्षक, डॉक्टर, संघातील कर्मचारी आणि मसाजर सुध्दा कारणीभूत असल्याचे खासदार महाडिक म्हणाले. विशेषतः ऑर्गॅनिक औषधाच्या नावाखाली उत्तेजक द्रव्य बाजारात उपलब्ध झाली. त्यामुळेच डोपींगचे प्रकार वाढले आहे. चाचणीत दोषी ठरलेल्या खेळाडूंचे संपूर्ण आयुष्य उध्दवस्त होवू लागले. काही वेळा खेळाडूंना फसवूनही त्यांना नकळत उत्तेजक द्रव्य दिले जाते. अशा वेळी जनजागृती अत्यंत महत्वाची असल्याचे खासदार महाडिक यांनी नमूद केले. प्रस्तावित अँटी डोपिंग कायद्याच्या विधेयकाबद्दल शालेय स्तरापासून जनजागृती व्हावी, डोपिंग टेस्टींगसाठी आधुनिक प्रयोगशाळा उभाराव्यात, दोषी आढळणाऱया खेळाडूंवर ताबडतोब बंदी न घालता, त्यांचे समुपदेशन करून त्यांना आणखी एक संधी द्यावी, डोपिंग पॅनेलवर निवृत्त न्यायमुर्ती किंवा कायद्याच्या अभ्यासकांचा समावेश असावा, निःपक्षपातीपणे खेळाडूची चौकशी व्हावी, अशा मागण्या खासदार महाडिक यांनी केल्या आहेत.
राज्यसभेत प्रथमच भाषण
याआधी लोकसभा गाजविण्याऱ्या खासदार महाडिक यांनी राज्यसभेत पहिल्यांदाच अभ्यासूपणे मांडणी केली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले. तसेच कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेचा आवर्जुन गौरवाने उल्लेख केला. आपण एक स्वतः खेळाडू असल्याचेही त्यांनी सभागृहाला सांगितले.