गडेकर भाटले पेडणे ग्रामस्थांचा इशारा : पाणी नियमित नाही बिले मात्र नियमित
प्रतिनिधी /पेडणे
पालिका क्षेत्रातील गडेकर भाटले भागात कित्येक दिवस अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी शुक्रवारी दि. 30 रोजी पाणी विभाग पेडणे येथे धडक दिली. मात्र त्या ठिकाणी एकही अधिकारी जागेवर नव्हते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ग्रामस्थांनी सोमवारपर्यंत पाणीपुरवठा नियमित झाला नाही तर पाणीपुरवठा कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.
पेडणे पालिका क्षेत्रात पाण्याची समस्या तीव्र जाणवत आहे. पाणीपुरवठा करणारा चांदेल प्रकल्प हा अपुरा पडत असतानाही पेडणे तालुक्मयात होऊ घातलेल्या वेगवेगळय़ा प्रकल्पासाठी आता पाणी कुठून देणार? असा प्रश्न तयार झाला तर त्याच अनुषंगाने या चांदेल पाणी प्रकल्पाचे मोपा विमानतळाला आणि आयुष हॉस्पिटलला पाणी पुरवण्याचे काम सरकार करत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या घरातील नळाला पाणी नियमितपणे येत नाही, बिले मात्र नियमित येतात.
आता पाणी विभाग कार्यालयात जाब विचारायला आलो तर अधिकारी जागेवर नाही. त्यामुळे आम्ही आमच्या समस्या कुणाकडे मांडणार?, असा प्रश्न ग्रामस्थांनी यावेळी केला. यापूर्वीही तक्रारी केल्या. परंतु त्याची आजपर्यंत दखल घेतली नाही. त्यामुळे जर सोमवारपर्यंत पाणी नियमित न आल्यास पाणीपुरवठा कार्यालयावर घागर मोर्चा आणावा लागेल, असा इशारा यावेळी महिलांनी दिला.