तक्रारदार उपोषण करणार : शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट
प्रतिनिधी/पंढरपूर
पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) प्रशालेमध्ये संस्थाच पीटीआरवर नसल्याने मनमानीपणे बेकायदेशीर ठराव करून चुकीच्या पद्धतीने कामकाज होत असल्याची तक्रार तीन वर्षांपासून होत आहे. तरीही शिक्षणाधिकाऱयांकडून चौकशीला टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत तक्रारदार राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष नंदकुमार उपाशे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
पटवर्धन कुरोली प्रशाला पीटीआरवर नसल्याने बोगस ठराव होत आहेत. शिक्षकांना सेवा ज्ये÷तेनुसार नेमणुका न देता बेकायदेशीरपणे इतरांची नेमणूक होत आहे. कमी पात्रतेच्या शिक्षकांना मुख्याध्यापक करण्याचा घाट संचालक मंडळाकडून बोगस ठराव करून सुरू आहे. काही शिक्षकांना सह्यांचे कोणतेही अधिकार नसताना त्यांच्या सहीने बोगस दाखले सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही संस्थेचे अध्यक्ष, सचिव व प्रशासन कोणतीही दखल घेत नाही. या अगोदर नंदकुमार उपासे यांनी सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकाऱयांकडे तक्रारी केल्या होत्या.
माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. संस्थेच्या गैरकारभाराची चौकशी करून अहवाल सात दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मात्र वेळोवेळी मागणी करूनही तो अहवाल प्राप्त झाला का? संस्थेवर कारवाई का होत नाही, याबाबत शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकाऱयांकडून कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्याने नंदकुमार उपासे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. मात्र शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱयांकडून याविषयी एकमेकांकडे बोट दाखविले जात असल्याने शिक्षण क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिक्षण अधिकाऱयांचा मनमानी कारभार
या संस्थेतील गैरकारभाराविषयी तीन वर्षांपासून पुराव्यासह तक्रारी करूनही त्यांच्याकडून केवळ चौकशी व कारवाईचा फार्स सुरु आहे. संस्था चालकाकडून आर्थिक देवाणघेवाण होत असल्यामुळे अधिकारी मनमानी करत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष नंदकुमार उपासे यांनी केला आहे.
माहिती घेऊन पुढील कार्यवाही करु
पटवर्धन कुरोली प्रशालेतील गैरकारभाराविषयीच्या तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. अहवाल आपल्यापर्यंत अद्याप आलेला नाही. चौकशी अधिकारी सुधा साळुंखे यांनी चौकशी अहवाल टपालात सादर केला आहे का? याबाबत आपण सोमवारी माहिती घेऊन पुढील कार्यवाही करू.
भास्कर बाबर -शिक्षणाधिकारी, माध्यमिक सोलापूर
अहवाल दिला आहे
या संस्थेविषयी सुरू असलेल्या तक्रारीची चौकशी करून आपण तसा अहवाल माध्यमिक शिक्षणाधिकाऱयांना दिला आहे. पुढील योग्य निर्णय ते घेतील. -सुधा साळुंखे, उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक, सोलापूर