वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
दाक्षिणात्य अभिनेता विजय बाबूला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. विजय बाबूला 27 जून रोजी कोची येथून अटक करण्यात आली आहे. तपास पथकाला 3 जुलैपर्यंत विजय बाबूची चौकशी करण्याची अनुमती मिळाली आहे.
विजय बाबू हा मल्याळी चित्रपटसृष्टीतील निर्माता तसेच अभिनेता आहे. त्याच्या विरोधात लैंगिक शोषण तसेच बलात्कार यासारखे गंभीर आरोप करण्यात आले होते. पीडित महिलेने एर्नाकुलम पोलीस स्थानकात अभिनेत्याच्या विरोधात तक्रार नोंदविली होती. त्यानंतर पोलिसांनी लुकआउट नोटीस बजावली होती. तर विजय बाबूने अंतरिम जामिनासाठी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
गुन्हा नोंद झाल्यावर विजय बाबू दुबईत फरार झाला होता. जून महिन्यात तो भारतात परतला आहे. लैंगिक शोषणासह पीडितेचे नाव उघड करण्याचा आरोप विजय विरोधात आहे.