मुलांच्या देखभालीला मानतात डोकेदुखी, प्री-स्कूलमध्ये केवळ 3 टक्के पुरुष शिक्षक
एकीकडे जगात महिला-पुरुषांच्या समानतेवर भर दिला जात असताना ब्रिटनमध्ये छोटय़ा मुलांना शिकविण्यासाठी पुरुष शिक्षक मिळेनासे झाले आहेत. ही समस्या विशेषकरून प्री-स्कूलमध्ये दिसुन येत आहे, तेथे एकूण शिक्षकांपैकी केवळ 3 टक्के पुरुष आहेत. तेथील पुरुष छोटय़ा मुलांना शिकविण्याचा अभिमान बाळगण्याऐवजी त्यांची देखभाल करण्याचा प्रकार टाळू पाहत आहेत. याचमुळे ते नर्सरी स्कूल्समध्ये नोकरी करण्यास नकार देत आहेत.
पुरुष शिक्षकांच्या या भूमिकेमुळे तेथील स्थानिक प्रशासन आणि तज्ञांनाही चिंतेत टाकले आहे. प्री-स्कूलमध्ये पुरुष शिक्षकांची संख्या न वाढल्यास मुलांची देखभाल करण्याचे काम केवळ महिलांचे आहे ही धारणा कधीच मोडून काढता येणार नसल्याचे त्यांचे मानणे आहे.
पुरुष शिक्षकांचीही गरज
नर्सरीतील छोटय़ा मुलांच्या देखभालीला पुरुष शिक्षक डोकेदुखी मानत आहेत. छोटय़ा मुलांना शिकविण्यासाठी पुरुषांचे असणे सकारात्मक असते असे सरकारचे मानणे आहे. परंतु वेतन कमी असणे आणि समाजात कामाची स्वीकारार्हता कमी असल्याने पुरुष यात जोडले जात नाहीत. 2020 मध्ये एका अध्ययनात जे पुरुष शिक्षक रुजू होतात ते महिलांच्या तुलनेत लवकर नोकरी सोडत असल्याचे दिसून आले होते.
महिलांची कामगिरी
पुरुष शिक्षक मिळत नसले तरीही अवघड कार्यांमध्ये महिलांकडून पुरुषांच्या तोडीस तोड कामगिरी केली जात आहे. 2002 नंतर इंग्लंडच्या फायर ब्रिगेडमध्ये महिला कर्मचाऱयांची संख्या 1.7 टक्क्यांवरून वाढत 7.5 टक्क्यांवर पोहोचली आहे. देशातील एक तृतीयांश पेलीस अधिकारी महिलाच आहेत.