Tarun Bharat

माळेवाडी लघु प्रकल्पाच्या मुख्य दरवाजाला गळती; वाड्या-वस्त्यांवर पाणी टंचाई

ऐन उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई

राधानगरी/महेश तिरवडे

राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्यात असलेला माळेवाडी लघु प्रकल्पाच्या मुख्य दरवाज्यातील गळतीमुळे हा प्रकल्प मार्च महिन्यातच कोरडा पडला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी या प्रकल्पावर अवलंबून असणारी गावे, वाड्या वस्त्या, धनगरवाड्यांवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. राधानगरी धरणाच्या उगमाच्या ठिकाणच्या या गावांची ‘धरण उशाला कोरड घशाला’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे या गावांना पाणी प्रश्न निर्माण झाला आहे.

१९९० ते ९५ च्या दरम्यान तत्कालीन आमदार स्वर्गीय शंकर धोंडी पाटील यांनी राधानगरी धरणाच्या उगमस्थानी असणाऱ्या आणि धरणामध्ये बाधित झालेल्या गावांचा आणि धनगरवाड्यांचा पिण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी माळेवाडी डॅम या लघुप्रकल्पाची निर्मिती केली. या डॅमच्या उभारणीनंतर परिसरातील गावांना कधीही पाणी टंचाई जाणवली नव्हती गतवर्षी या धरणाच्या भिंतीतील मुख्य दरवाज्याला गळती लागली. संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने यावर्षी हा प्रकल्प मार्च पूर्वीच कोरडा पडला त्यामुळे या धरणावर अवलंबून असणारी ओलवन, दाजीपूर, बौद्धवाडी, भटवाडी, शिवाचीवाडी या गावांना भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. या दरवाज्याची याच वर्षी दुरुस्ती केली नाही तर पुढील वर्षीही प्रकल्पातील पाणी अवेळी संपून पाणी टंचाई निर्माण होणार आहे. स्थानिकामधून व ग्रामपंचायतच्या माध्यमातून या गळती संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करून व संबंधित अधिकारी यांना भेटून व निवेदन देऊन सुध्दा या गळतीकडे दुर्लक्ष केले आहे.

गेटची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करावी आणि गावांना टँकर पाणी पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. सन 2019 ते 2021 पर्यत तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. मात्र संबंधित विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीस या धरणात पाण्याची मोठया प्रमाणावर गळती झाली, त्यामुळे येथील रहिवाशांना सुमारे १ ते २ किमी पाण्यासाठी पायपीट करावी लागते, गावात असलेल्या मोजक्याच विहिरीवरती पाण्यासाठी रांगा लागल्या आहेत.

याच माळेवाडी डॅमवर कोटयावधी रुपये खर्चून बोटिंग आणि इतर पर्यटन वृद्धीच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. परंतु काही हजारात खर्च असणाऱ्या गळतीकडे संबंधित विभागांनी दुर्लक्ष केल्याने डॅम अवेळी कोरडा पडल्याने पाणी टंचाई निर्माण झालीच त्याबरोबर निर्माण केलेली बोटिंग सुविधा वापरावीना पडून आहे. परिसरातील वाड्या वस्त्या आणि धनगरवाड्यांचा पुढील वर्षीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाटबंधारे विभागाला प्रकल्पाच्या गळतीच्या दुरुस्तीची सुबुद्धी पावसाळ्या पूर्वी होणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

मारहाणीत गिजवणेच्या हमालाचा मृत्यू; गडहिंग्लजमधील घटना

Abhijeet Khandekar

यंदाचे बजेट लाल कपड्यात नव्हे; तर ऑनलाईन पद्धतीने

datta jadhav

टिकटॉकला दणका; 90 दिवसात संपत्ती विकण्याचे ट्रम्प यांचे आदेश

datta jadhav

‘एनडीआरएफ’ पथकांसाठी 15 लाखांचा निधी : राज्य शासनाचा निर्णय

Kalyani Amanagi

Kolhapur; बर्की बंधारा पाण्याखाली; ७० हून अधिक पर्यटक अडकले

Abhijeet Khandekar

शिरोळ येथे चारित्र्याच्या संशयावरून विवाहतेचा छळ

Archana Banage