वृत्तसंस्था/ कोलंबो
पुढील आठवडय़ात ऑस्ट्रेलिया आणि लंका यांच्यातील वनडे मालिका श्रीलंकेत खेळविली जाणार असून या मालिकेसाठी लंकन संघाच्या गोलंदाज स्ट्रटेजी प्रशिक्षकपदी माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची नियुक्ती करण्यात आली आहे.
38 वर्षीय मलिंगाने गेल्या फेब्रुवारीत झालेल्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर लंकन संघाला गोलंदाजीचे मार्गदर्शन केले होते. या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने लंकेचा 4-1 असा पराभव केला होता. 2021 साली मलिंगाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. भारतात नुकत्याच संपलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मलिंगा राजस्थान रॉयल्स संघाचा गोलंदाज प्रशिक्षक होता. ऑस्ट्रेलिया आणि लंका यांच्यात तीन टी-20 सामने आणि त्यानंतर पाच वनडे सामने होणार आहेत. त्यानंतर गॅलेमध्ये उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला कोलंबोत 7 जूनपासून प्रारंभ होईल.