नव्या पक्षाध्यक्षांसमोर अनेक आव्हाने
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे बुधवारी पदभार स्वीकारणार आहेत. परंतु ही जबाबदारी त्यांच्याकरता अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे. राजस्थानमधील राजकीय संकटावर त्वरित तोडगा काढण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. तसेच पुढील काही आठवडय़ांमध्ये होणाऱया गुजरात तसेच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाला समाधानकारक कामगिरी करता येईल अशी पावले उचलावी लागणार आहेत. तर 2024 ची लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी सर्वात मोठी अग्निपरीक्षा असणार आहे.
काँग्रेस अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाच्या अन्य नेत्यांच्या उपस्थितीत खर्गे हे पक्षाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. कर्नाटकातील मातब्बर नेते म्हणून ओळखल्या जाणाऱया 80 वर्षीय खर्गे यांनी 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीत काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यावर विजय मिळविला होता. पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. 24 वर्षांनी गांधी परिवाराच्या व्यतिरिक्त एखादा नेता काँग्रेसचा अध्यक्ष झाला आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला मजबूत करण्यासाठी खर्गे यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. तर राजस्थानात पक्षामध्ये सुरू असलेले कलह दूर करण्याची जबाबदारी त्यांना पेलावी लागणार आहे.
खर्गे हे सर्वांना सोबत घेत वाटचाल करणारे नेते म्हणून ओळखले जातात. हेच त्यांचे वैशिष्टय़ त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी उपयुक्त ठरू शकते. सद्यकाळात केवळ राजस्थान आणि छत्तीसगडमध्येच काँग्रेसचे स्वबळावरील सरकार आहे. तर 2023 मध्ये 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून यात कर्नाटकचाही समावेश आहे.
पक्षात अनुभवी नेते आणि तरुण नेत्यांदरम्यान संतुलन राखण्याची जबाबदारी खर्गे यांना पार पाडावी लागणार आहे. तसेच गांधी परिवाराच्या ‘रिमोट कंट्रोल’ने पक्ष चालत असल्याची धारणा चुकीची ठरविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.