Tarun Bharat

मल्लिकार्जुन खर्गेंची ईडीकडून चौकशी

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : यंग इंडियनच्या कार्यालयात आठ तास तपास

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची चौकशी केली. तब्बल आठ तासांनंतर रात्री साडेआठच्या सुमारास खर्गे कार्यालयातून बाहेर आले. तपास यंत्रणेने यंग इंडियनच्या कार्यालयातच त्यांची चौकशी केली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चौकशी सुरू झाली. याचदरम्यान कार्यालयाचीही झडती घेण्यात आली. बुधवारीही येथे झडती घेतल्यानंतर कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले होते.

ईडीच्या समन्सवर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खर्गे यांनी गुरुवारीच प्रश्न उपस्थित केला होता. संसदेच्या कामकाजादरम्यान बोलावणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी केला होता. यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर देताना कोणी चुकीचे केले तर तपास यंत्रणा कारवाई करतील, असे स्पष्टीकरण दिल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद रंगला होता.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभागृहात ईडीच्या समन्सचा मुद्दा उपस्थित केला होता. ईडीने मला नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. संसदेच्या कामकाजादरम्यान ते मला कसे बोलावू शकतात? मला 12.30 वाजता ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मला कायद्याचे पालन करायचे आहे. मात्र सभागृहाच्या कामकाजादरम्यान मला बोलावणे योग्य आहे का? असे खर्गे म्हणाले होते. या प्रश्नावर पीयूष गोयल यांनी सरकार कोणत्याही एजन्सीच्या कामात हस्तक्षेप करत नाही. हे काँग्रेसच्या काळात झाले असेल, पण आता कोणी चुकीचे काम केले तर तपास यंत्रणा त्यांचे काम करतील, असे त्यांनी सांगितले.

दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

संसदेचे कामकाज 14 व्या दिवशीही सुरू असताना काँग्रेसने दोन्ही सभागृहात सरकारविरोधात गदारोळ केला. या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी सभागृहात केला. हे प्रकरण नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीच्या कारवाईशी संबंधित आहे.

Related Stories

कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी ओवेसींनी जाहीर केली 3 उमेदवारांची पहिली यादी

Abhijeet Khandekar

महामार्गालगत मिळणार नाही मद्य

Patil_p

देशात 56 ठिकाणी ‘जी-20’च्या बैठका

Omkar B

शोपियान चकमकीत दहशतवादी ठार

Patil_p

म्युच्युअल फंडधारकांना मिळणार परताव्याची रक्कम लवकर

Patil_p

राजस्थानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 55 हजार पार

Tousif Mujawar