कोल्हापुरी फुटबॉलला प्रथमच राष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधीत्वाचा सन्मान
कोल्हापूर प्रतिनिधी
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या नूतन कार्यकारिणी सदस्यपदी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची बिनविरोध निवड झाली आहे. फुटबॉलची शतकीय परंपरा असणाऱया कोल्हापूरला मालोजीराजे यांच्या निवडीने प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधीत्वाचा सन्मान लाभला आहे. दरम्यान, मालोजीराजे यांच्या निवडीचे स्थानिक फुटबॉल जगतातून जोरदार स्वागत होत असून कोल्हापुरी फुटबॉलच्या विकासाला आणखीन चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
जागतिकस्तरावरील फुटबॉलची शिखर संघटना असणाऱया फिफाने गेल्या महिन्यात भारतीय फुटबॉल फेडरेशनवर निलंबनाची कारवाई केली होती. कारवाईचे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने निवडणुका घेण्यासंदर्भात आदेश दिले. त्यानुसार निवडणूक झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार बायचुंग भुतिया यांचा पराभव करून कल्याण चौबे अध्यक्ष झाले. उपाध्यक्षपदी एन. ए. हॅरिस आणि खजानिसपदी किया अजय यांची निवड झाली. 35 राज्यांच्या फुटबॉल संघटनांच्या प्रतिनिधींनी या निवडणुकीत भाग घेतला. 23 जणांची कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये मालोजीराजे यांचा समावेश आहे. निवडीनंतर केएसएचे पेट्रन इन चीफ श्रीमंत शाहू छत्रपती, विफाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मालोजीराजे यांचे विशेष अभिनंदन केले असून त्यांच्याकडून फुटबॉल विकासाचे कार्य राष्ट्रीय स्तरावर घडो, अशी भावना व्यक्त केली आहे.
फुटबॉलपटू ते फेडरेशन व्हाया विफा
छत्रपती घराण्यात जन्मलेल्या मालोजीराजे यांनी छत्रपती शाहू विद्यालयाच्या संघाचे फुटबॉलपटू म्हणून स्पर्धा गाजविल्या. त्यांनी पुढे केएसएच्या माध्यमातून फुटबॉल प्रचार, प्रसार आणि विकासाचे काम सुरू केले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (विफा) उपाध्यक्ष असणारे मालोजीराजे सध्या केएसएचेही अध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडीचे स्वागत होत असून भविष्यात कोल्हापुरात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सामने आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनाचा आशा पल्लवित झाल्या आहेत.