ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यात MPSC परीक्षेदरम्यान एका उमेदवाराकडे फोन आणि ब्ल्यूटूथ हेडसेट सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या उमेदवाराला ताब्यात घेतलं आहे. एमपीएससीनं ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
MPSC ने या ट्विटमध्ये म्हटलं की, महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1 ची परीक्षा आज होती. या परीक्षेदरम्यान विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. यामध्ये पुण्यातील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकारच्या हेतूने लपवलेले मोबाईल फोन व ब्लूटूथ हेडफोन आढळून आले. त्यानंतर या उमेदवाराला पोलिसांना ताब्यात घेतले आहे. उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, परीक्षेमध्ये अत्याधुनिक उपकरणाच्या मदतीने गैरप्रकार करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाला मिळाली होती. त्यानंतर आयोगाच्या दक्षता पथकाने अचानक संबंधित संशयित उमेदवारांची तपासणी केली. तेव्हा उमेदवारांकडे गैरप्रकारच्या हेतूने लपवलेले साहित्य आढळून आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे एमपीएससीचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी सांगितले.