वृत्तसंस्था/ कोलकाता
निवडणूक आयोगाकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराविरोधात विरोधी पक्षांनी संयुक्त उमेदवार उभा करावा, असे ममता बॅनर्जींचे प्रयत्न आहेत. यासाठी त्यांनी 15 जून या दिवशी आठ बिगर भाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला 22 नेत्यांनाही बोलाविण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी द्रमुक, भाकप आणि आपच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा केली होती. काँग्रेसचे ज्ये÷ नेते मल्लिकार्जुन खर्गेही या बैठकीत सहभागी झाले होते. विरोधी पक्ष राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविणार असून त्यासाठी संयुक्त उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले होते. याच प्रयत्नांचा पुढचा भाग म्हणून ही बैठक होत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या सर्वांना ममता बॅनर्जी यांनी पत्रे पाठविली आहेत.