भाजप नेते शुभेंदू अधिकारींचा ‘षटकार’
- सौरभ गांगुलीला ‘आयसीसी’ची निवडणूक लढवू द्या : ममता बॅनर्जी
- शाहरुखला हटवून सौरभला बंगालचा ब्रँड ऍम्बेसेडर करा : भाजप
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयसीसी निवडणूक लढवणाऱया सौरव गांगुलीच्या समर्थनार्थ उभ्या राहिल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सौरभ गांगुलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. सौरभने क्रिकेट आणि क्रीडा प्रकारांसाठी विशेष योगदान दिल्याने केंद्र सरकारने राजकीयदृष्टय़ा निर्णय घेऊ नये, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी गांगुलीसाठी ‘फिल्डिंग’ लावली. मात्र, ममतांच्या या आवाहनावर भाजपचे आमदार आणि बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी निशाणा साधला आहे. ‘जर ममता बॅनर्जी यांना सौरभ गांगुलीचा कळवळा असेल तर शाहरुख खानऐवजी त्याला पश्चिम बंगालचा ब्रँड ऍम्बेसेडर बनवायला हवा होता’, असा ‘षटकार’ खेचला आहे. तसेच ममतांनी खेळात राजकारण आणू नये. पंतप्रधान मोदी अशा गोष्टींपासून बरेच दूर असतात, असेही शुभेंदू अधिकारी यांनी सुनावले.
सौरभ गांगुली कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही. तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (आयसीसी) अध्यक्ष होता. त्याच्यावर अन्याय झाला असून केंद्र सरकारने त्याला आयसीसी निवडणुकीसाठी नामांकन द्यावे, असे सोमवारी कोलकाता विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. मी सर्व देशवासियांच्या वतीने बोलत आहे. सौरभ गांगुली हा आमचा अभिमान आहे, त्याने आपली क्रीडा आणि प्रशासकीय कारकीर्द कुशलतेने सांभाळली आहे. त्याची लोकप्रियता वाढल्यानेच त्याला दूर केले जात असल्याचेही ममता म्हणाल्या.