लांजा येथील घटना, २४ हजार रूपये दंडाची ठोठावली शिक्षा
प्रतिनिधी/रत्नागिरी
लांजा तालुक्यातील 14 वर्षीय मुलीवर मातृत्व लादणाऱ्याला न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावास व 24 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. अक्षय शिवाजी गवड (23, पन्हाळा कोल्हापूर सध्या लांजा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध लांजा पोलिसांनी भादंवि कलम 376 व पॉक्सो कायद्यानुसार दोषारोपपत्र ठेवले होते.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र व विशेष पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला आबासाहेब राऊत यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाकडून ॲड. पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले. खटल्यातील माहितीनुसार, आरोपी अक्षय गवड मूळ कोल्हापूर येथील असून तो लांजा येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्य करत होता. 2020 मध्ये अक्षयची लांजा येथील 14 वर्षीय पीडित मुलीशी ओळख झाली व अक्षयने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
दरम्यान अक्षयने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवत मे ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित मुलीला पोटात दुखू लागल्याने तिला उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल केले असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पीडितेच्या नातेवाईकांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात शुन्य नंबरने तक्रार दाखल केली. पोलिसांनी अक्षय गवड याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास लांजा पोलिसांकडे वर्ग केला.
हे ही वाचा : सराफ व्यापाऱ्यांचा मोबाईल मुंबईला नेणाऱ्याचा पोलिसांना शोध
लांजा पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल गंभीर व उपनिरीक्षक श्वेता पाटील यांनी अक्षय याच्याविरूद्ध भादंवि कलम 376 (2)(3) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध कायदा 2012 (पॉक्सो) नुसार गुन्हा दाखल केला. गुह्याचा तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले. खटल्यादरम्यान एकूण 20 साक्षीदार तपासण्यात आले.