पणजी-रेईश मागूश प्रवासी ’रोप वे’ प्रकल्पाला मंजुरी
जय नाईक/ पणजी
‘सन, सँड अँड सी’ या पारंपरिक संकल्पनेतून बाहेर पडत गोव्याच्या पर्यटनाला नवीन आयाम देण्यासाठी पर्यटन खात्याने राज्यातील आपल्या पद्धतीचा पहिला अनोखा ‘प्रवासी रोप-वे’ प्रकल्प आखला असून त्यासाठी खासगी ऑपरेटरशी करार केला आहे.
या प्रकल्पाला गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने नुकतीच मंजुरीही दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता सत्यात येणार हे निश्चित झाले आहे. 1.24 किमी लांबीच्या या प्रकल्पाच्या उभारणीवर सुमारे 160 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
गोव्यात 1970 च्या दशकात होता रोप वे
‘रोप वे’ ही संकल्पना तशी गोमंतकीयांसाठी नवीन नाही. अगदी 1970 च्या दशकात गोव्यात रोप वे प्रकल्प अस्तित्वात होता. आताच्या सांखळी मतदारसंघात पाळी येथे चौगुले या कंपनीच्या खाणीवरून कित्येक किलो मीटर दूर असलेल्या कोठंबी गावात नदीकिनारी रोप वे च्या माध्यमातून अवाढव्य पाळण्यात भरून खनिज मालाची वाहतूक करण्यात येत होते. त्याकाळी ट्रकांमधून खनिज वाहतूक हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. खाणीवरून जेटीपर्यंत जाण्यासाठी रस्तेही नव्हते. खाण मालकांकडे जे काही अवजड ट्रक होते ते केवळ खाणींवरच वापरात येत होते. त्यामुळे प्रारंभीच्या काळात बैलगाडय़ांचा वापर होत होता. परंतु ती पुरेशी पडत नव्हती. त्यावर उपाय म्हणून चौगुले कंपनीचे खनिज खरेदीदार असलेल्या एका विदेशी कंपनीने स्वखर्चाने हा प्रकल्प बांधून दिला होता. त्यानंतर पुढील दीड-दोन दशकांच्या कालावधीत खनिज वाहतुकीत हळुहळू ट्रकांचा वापर होऊ लागला. ट्रकांची संख्या वाढू लागली तसा रोप वे चा वापर कमी होत गेला व 1985-87च्या आसपास तो कायमस्वरुपी बंद करण्यात आला.
मध्यंतरी 1982 मध्ये आलेल्या ‘हथकडी’ या शत्रुघ्न सिन्हा अभिनित चित्रपटात हा रोप वे दाखविण्यात आला होता. त्याकाळी हा रोप वे म्हणजे देशातील बहुधा एकमेव प्रकल्प असावा. त्यामुळेच बॉलिवूड चित्रपट निर्मातेसुद्धा त्याकडे आकर्षित झाले होते यावरून त्याचे महत्व लक्षात यावे.
आता पुन्हा एकदा गोमंतकीयांना रोप वे चे दर्शन घडणार आहे. मात्र ते पाळी सारख्या ग्रामीण भागात नव्हे तर थेट राजधानी पणजी शहरात होणार असून हा रोप वे प्रवासी वाहतुकीसाठी वापरात येणार आहे. राज्यात यापूर्वी विविध मनोरंजनात्मक पर्यटन उपक्रम कार्यरत झाले आहेत. झिप-लाइन, स्काय डायव्हिंग, हवेत तरंगते रेस्टॉरंट, बंगी जंपिंग, स्कीइंग, सर्फिंग यांसह अनेक साहसी पर्यटन प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. त्यात आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अद्वितीय अशा रोप वे प्रकल्पाची भर पडणार आहे. त्यामुळे अधिकाधिक पर्यटक गोव्याकडे आकर्षित होण्यात मदत होणार आहे.
राजधानी पणजीतून मांडवी नदी पार करत हा ‘रोप वे’ पैलतिरावरील रेईश मागूश किल्ल्याच्या परिसरात उतरणार आहे. या प्रवासी रोप वे च्या माध्यमातून पर्यटन उपक्रमांसाठी गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे जीसीझेडएमए मंजुरी मागितली होती, ती आता प्राप्त झाली आहे.
हा प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर या तत्वावर हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळने खाजगी कंपनीसोबत यापूर्वीच करार केला आहे.
राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा हा प्रकल्प अत्याधुनिक सुविधांसह अद्वितीय असेल. त्याद्वारे नाविन्यपूर्ण आणि उच्च दर्जाच्या पर्यटन पायाभूत सुविधांसह समुद्रकिनारे आणि साहसी पर्यटनावर अधिक भर देण्यात मदत होणार आहे.
मांडवी नदीची सफर करण्यासाठी आतापर्यंत होडी, फेरीबोट, क्रूझ बोटी आदीं साधनांचा वापर होत होते. त्याशिवाय हवा आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी चालणारे ’एम्फिबियन’ वाहनही वापरात आणण्यात आले आहे. या सर्वांबरोबरच आता तारेवरून झुलत्या पाळण्यात बसून नदी पार करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.