नॉर्थ झोन आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना आयोजित नॉर्थ झोन आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने मंगळूर संघाला 1-1 बरोबरीत रोखले. गुणाच्या आधारे मंगळूर संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
सकाळी खेळविण्यात आलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने बलाढय़ मंगळूर संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले. या सामन्यात 40 व्या मिनिटाला मंगळूरच्या रविंद्रनने गोल करून बेळगाव संघावर आघाडी मिळविली. दुसऱया सत्रात 64 व्या मिनिटाला अभिषेकच्या पासवर प्रद्युम्न बोकडेने गोल करून बेळगावला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही संघानी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्यांना अपयश आले.
रविवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मंडय़ा संघाने बेळगाव संघाचा 2-1 असा पराभव केला. मंडय़ातर्फे 27 व्या मिनिटाला के हरिषने गोल केला. तर दुसऱया सत्रात 71 व्या मिनिटाला मुत्तूने गोल केला. बेळगावतर्फे 81 व्या मिनिटाला प्रद्युम्न बोकडेने गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. ही स्पर्धा साखळी पद्धतीची राहिल्याने गुणाच्या आधारे मंगळूर संघाने दोन्ही सामन्यातून विजय संपादन करून 6 गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश केला. बेळगाव संघाचे प्रशिक्षक गिरीष गणेशकर तर संघव्यवस्थापक अल्लाबक्ष बेपारी आहेत.