Tarun Bharat

लहरी हवामानामुळे आंबा, काजू संकटात

कोकणातील आंबा, काजू बागायतदार व शेतकऱयांवरील नैसर्गिक आपत्तीचे दुष्टचक्र संपलेले नाही. गतवर्षीप्रमाणे यावेळीही लहरी हवामान व ढगाळ वातावरणासह झालेल्या अवकाळी पावसामुळे हे पिक पुन्हा संकटात आले आहे. त्यामुळे शेतकऱयाला सावरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हायला हवा.

कोकणातील शेतकऱयांनी आतापर्यंत अनेक संकटे झेलली आहेत. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. यावर्षी उशिरापर्यंत पाऊस सुरुच राहिल्याने हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामधून सावरतो न सावरतो तोच लहरी पावसामुळे फळपिकेही संकटात आली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्टय़ा पूर्णतः कोलमडला आहे.

कोकणातील भातपिक घेणारा शेतकरी असो, मच्छीमार असो किंवा फळबागांचे उत्पन्न घेणारा शेतकरी. या सर्वांना आतापर्यंत छोटय़ा-मोठय़ा अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. यावर्षीही कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हय़ांत भात कापणीच्या ऐन हंगामात अतिवृष्टी सुरू राहिल्याने ओढवलेल्या ओल्या दुष्काळामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. परंतु, अजून भरपाई मिळालेली नाही. या शेतकऱयाला तुटपुंजी मदत देऊन सावरता येणार नाही. त्यासाठी भरीव मदत देणे आवश्यक असून पुढील हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून देणे, पिक कर्जमाफी करून आर्थिक संकटातून बाहेर काढल्यास हा शेतकरी सावरू शकतो.

कोकणामध्ये दरवर्षी सरासरी 3,300 ते 3,400 मि. मी. च्या सरासरीने पाऊस पडतो. यावर्षी सरासरी गाठत पावसाळी हंगाम संपला. मात्र ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडल्यामुळे शेतकऱयांना भातपिकाच्या नुकसानीला सामोरे जावे लागले. परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱयांच्या उपजीविकेचे साधनच हिरावले गेले. भातशेतीची माती झाली. काही ठिकाणी पंचनामेही झाले. परंतु, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱयांच्या डोळय़ातील अश्रूंचे काय? ते कोण पुसणार? त्यांना कोण सावरणार? या प्रश्नांची उत्तरे मात्र मिळत नाहीत. ज्यावेळी अतिवृष्टी सुरू होती, त्यावेळी राज्यकर्ते व लोकप्रतिनिधींना शेतकऱयांचा कळवळा आला. भरपाई मिळवून देण्याची आश्वासनेही मिळाली. परंतु तसे काही झाले नाही.

पावसाळी हंगाम संपल्यानंतर फळपिकाच्या हंगामाला सुरुवात होते. फळझाडांना पालवी येऊ लागते. नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू होणाऱया थंडीमुळे फळपिकाला पोषक वातावरण निर्माण होते. परंतु कोकणामध्ये शेतकरीवर्ग भातपिकाच्या नुकसानीतून सावरत असतानाच लहरी हवामानामुळे आंबा व काजू पिकही संकटात सापडले आहे. थंडीनंतर गेल्या आठवडय़ात झालेल्या हवामानातील बदल व पाऊस यामुळे कोकणातील आंबा व काजू पिकावरील किडींचा व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम फळपिकांच्या पुढील उत्पादनाच्या प्रक्रियेवर होऊन यंदाचा हंगाम उशिरा व कमी उत्पन्नाचा होण्याचा अंदाज दापोली कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आंबा व काजू पिक बागायतदारांना आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

कोकण विभागामध्ये राबविण्यात आलेल्या फुलोत्पादन योजनेमुळे गेल्या 15-20 वर्षांत आंबा व काजू लागवडीचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात वाढलेले आहे. या पिकाच्या माध्यमातून दरवर्षी 300 कोटीपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे येथील शेतकरी बागायतदार आंबा व काजू पिकाच्या लागवडीकडे अधिकाधिक वळू लागला. शासनाने रोजगार हमी योजनेमधूनही फळपिक लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे छोटय़ा-छोटय़ा शेतकऱयांनीही योजनेचा फायदा घेऊन आंबा व काजू पिकाची लागवड केली. परंतु, गेल्या तीन-चार वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे आंबा, काजू पिकाचे नुकसान होऊन आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या आंबा, काजू पिकाची लागवड यापुढे करायची की नाही, असा प्रश्नही बागायतदारांसमोर निर्माण झाला आहे.

अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि वाढलेली आद्रता यामुळे आंबा पिकांवर तुडतुडे, फुल कीडी, भुरी व करपा रोग तसेच काजूमध्ये ढेकण्या, फुलकिडी व करपा रोग यांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांना पिकांचे वेळोवेळी सर्वेक्षण करून काळजी घेणे आवश्यक बनले आहे. मात्र त्यासाठी शासनाकडून शेतकऱयांना सहकार्य मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गेल्या चार-पाच वर्षांत सतत बदलणाऱया हवामानामुळे पिकांवर होणाऱया परिणामांचा सामना करण्यासाठी संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे. या संशोधनामधून बदलत्या हवामानाचा परिणाम फळपिकांवर होणार नाही, अशा प्रकारच्या उपाययोजना सूचविल्यास शेतकरी वर्ग आर्थिक संकटातून तारु शकतो. फळ पिकावरही हवामानाचा फारसा परिणाम न होता, बदलत्या हवामानातही फळ पिक टिकून राहू शकते, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित होणे आवश्यक आहे.

आंबा व काजू फळ पिकांकरीता ‘क्रॉपसॅप’ योजनेंतर्गत कीड रोग सर्व्हेक्षण, सल्ला व व्यवस्थापनासाठी शासनाच्या फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्व्हेक्षण व सल्ला व्यवस्थापनासाठी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड या जिल्हय़ासह कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हय़ांमध्येही हा प्रकल्प राबविला जात आहे. परंतु, तो राबवत असताना कीड रोगांवर तात्पुरते इलाज होत आहेत. त्यामुळे आंबा व काजू पिकांवरील कीड रोगांवर सल्ला देतानाच शासनाने बदलत्या हवामानामुळे फळपिकांवर होणारा परिणाम रोखण्यासाठी उपाययोजना करण्याकरीता शास्त्रज्ञांची समिती स्थापन करून कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कापूस पिकावर होणारा दुष्परिणाम रोखण्याकरीता संशोधन करण्यात आले होते. त्याच पद्धतीने शासनानेही कोकणवरही कृपादृष्टी दाखवून कोकणामध्ये संशोधन करणे आवश्यक आहे. तसेच नुकसान भरपाई मिळण्यासाठी फळपिक विमायोजना राबविली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱयांना भरपाई मिळू शकते. परंतु, फळपिक विमा योजनेतील जाचक अटींमुळे अनेकदा नुकसान होऊनही भरपाई मिळत नाही. कोकणातील भौगोलिक परिस्थिती अतिशय वेगळी आहे. दुर्गम भागात लोक राहतात. मोठमोठी गावे आहेत. त्यामुळे महसूल मंडळांमध्ये ज्यावेळी पर्जन्यमानाची नोंद घेतली जाते, त्यावेळी काही ठिकाणी पर्जन्यमानाची नोंदच होत नाही.  परिणामी लगतच्या महसूल मंडळातील लोकांना नुकसान भरपाई मिळत नाही. ही परिस्थिती कोकणात सर्रास अनुभवास येते. त्यामुळे फळपिक विमा योजनेतील नियमांमध्ये बदल करून शेतकऱयांना भरपाई मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.

संदीप गावडे

Related Stories

विचारदोषाची अनटोल्ड स्टोरी!

Patil_p

‘दिल्ली’त एकत्र, ‘गल्ली’त वेगळे लढणार!

Patil_p

शाळा सुरू करण्यासाठी कोकण तयार

Patil_p

महाकवी नाटककार शूद्रकाचे ‘मृच्छकटिक’ (32)

Patil_p

हस्ताक्षर किमया

Patil_p

कोरोना: पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्रव्यूहात

Patil_p