Tarun Bharat

मनिका बात्राचे ऐतिहासिक यश

आशियाई चषक टेटेमध्ये कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू

वृत्तसंस्था/ बँकॉक

भारताची अव्वल महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्रा ही आयटीटीएफ-एटीटीयू आशियाई चषक टेटे स्पर्धेत पदक मिळविणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवित ऐतिहासिक कामगिरी केली. तिने कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत जपानच्या जागतिक सहाव्या मानांकित हिना हायाताला पराभवाचा धक्का देत हे यश मिळविले.

जागतिक क्रमवारीत 44 व्या स्थानावर असणाऱया मनिकाने हायाताचा 4-2 (11-6, 6-11, 11-7, 12-10, 4-11, 11-2) असा पराभव करीत ऐतिहासिक यश मिळविले. कांस्यपदकासह तिला 10,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीसही मिळाले. ‘अव्वल खेळाडूंना नमवित हे यश मिळविल्याने माझ्यासाठी हा खूप मोठा विजय आहे. मी त्यांच्याशी लढताना आणि खेळताना खूप एंजॉय करीत या यशापर्यंत पोहोचले. यापुढील स्पर्धांतही याहून कठोर परिश्रम करीत मोठे यश मिळविण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यावेळी आताप्रमाणे मला तुमचा पूर्ण पाठिंबा मिळेल, अशी मी अपेक्षा करते,’ असे मनिका यशानंतर म्हणाली.

दिवसाच्या सुरुवातीस मनिकाला उपांत्य फेरीत जपानच्या दुसऱया मानांकित मिमा इटोकडून 2-4 (8-11, 11-7, 7-11, 6-11, 11-8, 7-11) असा पराभव स्वीकारावा लागला होता. इटोने अडखळत सुरुवात केली असली तरी तिने नंतर जबरदस्त खेळ करीत मनिकावर मात केली. मनिकाची लढाऊ वृत्ती कांस्यपदकाच्या प्लेऑफ लढतीतील चौथ्या गेममध्ये दिसून आली. मनिका बरीच पिछाडीवर पडली होती. हायाता यावेळी 10-6 अशी पुढे होती आणि तिला चार गेमपॉईंट मिळाले होते. अशा स्थितीत जिद्दी मनिकाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करीत अचूक फोरहँड्स, बॅकहँड पंचेस फटक्यांचा प्रभावी वापर करीत हायाताला हैराण केले. डय़ूसवर असताना हायाता सर्व्हिस करीत होती. पण तिचा फटका नेटला लागून चेंडू तिच्याच बाजूला पडला. त्यामुळे मनिका 11-10 वर पोहोचली. नंतर आपल्या सर्व्हिसवर मनिकाने गेम संपवला. पाचवा गेम हायाताने घेत मनिकाची आघाडी 3-2 अशी कमी केली. सहाव्या गेममध्ये मनिकाने आपल्या डावपेचात बदल करीत प्रारंभापासूनच आक्रमणावर भर दिला. हायाताने पहिला गुण घेतला तरी मनिकाने 3-1 व नंतर 5-2 अशी बढत घेतली. पण यानंतर हायाताला एकही गुण मिळविता आला नाही. मनिकाने तिला नंतर अखेरपर्यंत तशी संधीच दिली नाही आणि हा गेम 11-2 असा घेत कांस्यपदक निश्चित केले.

मनिकाने या स्पर्धेतील शेवटच्या सोळा फेरीत चीनच्या जागतिक सातव्या मानांकित चेन झिंगटाँगचा धक्कादायक पराभव केला, त्यानंतर पुढच्या फेरीत तैपेईच्या 23 व्या मानांकित चेन झू हिलाची धक्का दिला. शुक्रवारी तिने उपांत्य फेरी गाठत भारतातर्फे या स्पर्धेत आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती तर शनिवारी त्यावर कळस चढवित तिने कांस्यपदकाला गवसणी घालण्याचा पराक्रम केला. यापूर्वी अचंता शरथ कमल व जी. साथियान यांनी 2015 व 2019 मध्ये सहावा क्रमांक मिळवित भारतातर्फे सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. या स्पर्धेत आशियामधील क्रमवारीतील अव्वल 16 महिला व पुरुष टेटेपटूंनी भाग घेतला होता.

Related Stories

‘तो’ लोगो हटवण्याची मोईन अलीला परवानगी

Patil_p

पाक संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण

Patil_p

ऍश्ले बार्टी, कॉलिन्स यांच्यात जेतेपदाची लढत

Amit Kulkarni

चहापानाअखेर इंग्लंड 36 धावांनी आघाडीवर

Patil_p

निकोल्सच्या नाबाद शतकाने न्यूझीलंड सुस्थितीत

Patil_p

इसेक्सच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी निक लेविस

Patil_p