ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कथित दारू घोटाळय़ातील आरोपी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी 4 मार्च रोजी त्यांच्या सीबीआय कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली होती.
सिसोदिया यांना कथित दारू घोटाळा प्रकरणात तपासात सहकार्य न केल्यामुळे 26 फेब्रुवारीला 8 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने अटक केली होती. 27 फेब्रुवारीला त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सिसोदिया यांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. जेणेकरुन त्यांची सविस्तर चौकशी करता येईल. त्यानंतर सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज राऊस अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने त्यांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
अधिक वाचा : मुख्यमंत्री शिंदेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट; तरुणावर गुन्हा
दरम्यान, आज झालेल्या सुनावणीवेळी सिसोदिया यांनी न्यायालयीन कोठडीत औषधे, डायरी, पेन आणि भगवद्गीता तुरुंगात ठेवण्याची परवानगी मागितली होती. त्याला न्यायालयाने परवानगी देण्याचे मान्य केले आहे. सिसोदिया यांना मेडिटेशन सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.