ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कथित दारू घोटाळय़ातील आरोपी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची 17 मार्चपर्यंत ईडी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सिसोदिया यांना कथित दारू घोटाळा प्रकरणात तपासात सहकार्य न केल्यामुळे 26 फेब्रुवारीला 8 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने अटक केली होती. 27 फेब्रुवारीला त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सिसोदिया यांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. जेणेकरुन त्यांची सविस्तर चौकशी करता येईल. त्यानंतर सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर 6 मार्चला राऊस अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने त्यांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
ईडीही या प्रकरणाचा तपास करत आहे. ईडीने सिसोदियांच्या चौकशीसाठी राऊस अव्हेन्यू न्यायालयात 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना 7 दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले आहे.