राउज अॅव्हेन्यू न्यायालयाकडून ईडीला नोटीस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी 11 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने मंगळवारी ईडीकडून नोंदविण्यात आलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी सुनावणी केली आहे. न्यायालयाने तपास यंत्रणेला सर्व दस्तऐवज सादर करण्याचा निर्देश दिला आहे.
ईडीकडून आरोपींचे काही दस्तऐवज अद्याप सादर करण्यात आलेले नाहीत असे म्हणत न्यायालयाने ईडीला यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्याच दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.
आप नेते सिसोदियांवर दिल्ली अबकारी घोटाळ्यात भ्रष्टाचार केल्याचा आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. 269 दिवसांपासून तुरुंगात कैद सिसोदिया यांनी दाखल केलेले जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. राउज अॅव्हेन्यू न्यायालय अन्य आरोपी बिनॉय बाबूच्या अंतरिम याचिकेवर 24 नोव्हेंबर रोजी सुनावणी करणार आहे.