भन्साळी यांच्या सीरिजमध्ये दिसणार मुमताज
संजय लीला भन्साळी हे ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या यशानंतर सध्या स्वतःची आगामी वेबसीरिज ‘हीरामंडी’ची तयारी करत आहेत. या सीरिजसाठी अद्याप कलाकारांची अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु अलिकडेच भन्साळी यांनी मनीषा कोईराला आणि मुमताज यांची भेट घेतल्याने त्यांची या सीरिजकरता निवड झाल्याचे मानले जात आहे.
एका छायाचित्रात भन्साळी हे मनीषा आणि मुमताज यांच्यासोबत दिसून येत आहेत. मनीषा आणि मुमताज यांना या सीरिजमध्ये पाहणे चाहत्यांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. हीरामंडी सीरिजमध्ये माधुरी दीक्षित, अदिति राव हैदरी, ऋचा चड्ढा, हुमा कुरैशी आणि सोनाक्षी सिन्हा हे दिग्गज कलाकार दिसून येणार असल्याचे समजते.
दिग्गजांच्या सान्निधात राहणे मला अत्यंत आवडते. माझा चेहराच सर्वकाही व्यक्त करतोय असे म्हणत मनीषाने छायाचित्र शेअर केले आहे. या सीरिजमध्ये नृत्य करावे लागणार असून पती याची अनुमती देणार नसल्याचे मुमताज यांनी यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते. परंतु भन्साळी यांच्यासोबतचे छायाचित्र समोर आल्याने मुमताज यांनी हीरामंडीमध्ये काम करण्यासाठी होकार दिल्याची चर्चा आहे. जर असे घडले तर मुमताज सुमारे 45 वर्षांनी पडद्यावर परतणार आहेत.
महिमा चौधरी, दीप्ति नवल, अदिति राव हैदरी समवेत अनेक कलाकारांनी या छायाचित्रावर कॉमेंट केली आहे. चाहते देखील ‘खामोशी’ चित्रपटानंतर मनीषा आणि संजय लीला भन्साळी यांच्या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘हीरामंडी’ सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केली जाईल.