वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा माजी अष्टपैलू मनोज प्रभाकरची नेपाळ क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नेपाळ क्रिकेट मंडळाने ही घोषणा मंगळवारी केली.
नेपाळ क्रिकेट संघाला यापूर्वी लंकेचा पी. दासनायके प्रशिक्षक म्हणून लाभला होता. गेल्या जुलै महिन्यात दासनायकेने आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. कॅनडा संघाच्या प्रशिक्षकपदी दासनायकेची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे नेपाळ क्रिकेट मंडळाने मनोज प्रभाकरकडे प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज प्रभाकरने 1984 ते 1996 या कालावधीत 39 कसोटी आणि 130 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर त्याने प्रशिक्षक क्षेत्रात पदार्पण करताना दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेश रणजी संघांना मार्गदर्शन केले आहे. 2016 साली अफगाणच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा तो गोलंदाज प्रशिक्षक होता.