अफाट बुद्धिमत्ता, स्मरणशक्तीचा खजिना : कोटीपर्यंतच्या संख्येची क्षणात बेरीज : वर्गातील अभ्यास शिकविताच तेंडपाठ
महेश शिंपुकडे /निपाणी
वय अवघे आठ वर्षे, इयत्ता दुसरीत ज्ञानार्जन, दुचाकी मेकॅनिकचा सामान्य कुटुंबातील मुलगा, अशी ओळख असणारा विद्यार्थी म्हणजे मंथन दीपक किर्तने. त्याची अफाट बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती सर्वांनाच अचंबित करून सोडणारी आहे. एकप्रकारे बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीची दैवी देणगी लाभलेला विद्यार्थी म्हणून संबोधले जात आहे. यामुळे ज्ञानसागरातील मौल्यवान मोती श्रीपेवाडीचा ‘मंथन’ अशी ओळख निर्माण झाली आहे.
श्रीपेवाडी हे गाव अवघे सुमारे 4 हजार लोकवस्तीचे. या छोटय़ाशा गावातून अनेकांनी स्वकर्तृत्वावर आपली ओळख रेखाटली. पण यापेक्षाही पुढे जात जी. एम. संकपाळ प्राथमिक शाळेत शिकणारा इयत्ता दुसरीतील विद्यार्थी मंथन सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. त्याची अफाट स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता शिक्षकांनाच नव्हे तर पालक व नागरिकांना अचंबित करून सोडत आहे. बुद्धीचा वेग आणि स्मरणशक्तीची देणगी यातून त्याचे उज्ज्वल भविष्य सर्वांसाठी अपेक्षा वाढवत आहे.
मंथन सध्या क्रमवारीतून बेरीज कोटीच्या अंकापर्यंत सहजपणे करतो. उलट अंक सांगणे, देशांची नावे, मराठी शब्द सांगताच त्या शब्दाचे इंग्रजी स्पेलिंग सहजपणे सांगतो. अंकाचा वर्ग व घन सांगण्याबरोबरच संख्येचा विस्तारही सांगतो. देव-देवतांसह, थोर पुरुष, प्रसिद्ध खेळाडूंची इत्यंभूत माहिती विचारताक्षणी सांगतो. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मंथनच्या या वेगळेपणाला स्वरूप देण्याचे काम त्याचे शिक्षक व शाळा करत आहे.
अवाप् करणारे प्रश्न
मंथन हा चिमुकला नेहमीच आपले पालक, शिक्षक यांना प्रश्न विचारून उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करत असतो. गणपती विसर्जन नुकतेच झाले. यावेळी त्याठिकाणी तो स्तब्धपणे बसला होता. अशावेळी त्याला पालकांनी विचारले असता मला बरेच माहीत आहे, पण गणेशाचे आडनाव माहीत नाही, ते कोण सांगेल का? असा सवाल केला. या अवाप् करणाऱया प्रश्नाने सारेच अचंबित झाले.
शिकविलेले सारेच तोंडपाठ
स्मरणशक्तीची देणगी लाभलेला मंथन वर्गात जे काय शिकविले जाते ते लगेच त्याला तोंडपाठ असते. शुद्धलेखन लिहिताना कधीही पुस्तक न उघडता संपूर्ण पुस्तकातील पाठच शुद्धलेखन म्हणून लिहितो. बुद्धिबळात अनेकांना हरविण्यात सहजपणे यशस्वी होतो. मोबाईलचा वापर सहजपणे करतो. पण मोबाईल वापरताना ज्ञानाचे धडेच गिरवतो व इतरांनाही सल्ला देतो. मैदानी खेळातही नेहमीच अग्रेसर असतो.