मुत्सद्देगिरीच्या आघाडीवर भारतासमोर मोठी संधी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पुढील काही महिन्यांमध्ये भारतात व्हीव्हीआयपी विदेशी पाहुण्यांचे मोठय़ा संख्येत आगमन होणार आहे. जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कोल्ज, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज हे लवकरच भारताच्या दौऱयावर येणार आहेत. यादरम्यान युक्रेन संकट, अन्नधान्य संकट आणि जागतिक ऊर्जा गरजांप्रकरणी भारत या देशांसोबत मिळून मोठे कुटनीतिक निर्णय घेणार आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रीन यांचा दौरा तर अत्यंत खास ठरणार आहे. यादरम्यान भारत नौदलासाठी राफेल या लढाऊ विमानाची मरीन आवृत्ती खरेदी करण्यासाठी फ्रान्ससोबत करार करणार असल्याचे मानले जात आहे. या दौऱयाचा मुख्य उद्देश या देशांसोबत ऊर्जा, व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादन, आरोग्याच्या क्षेत्रातील संबंध दृढ करणे आहे.
या राष्ट्रप्रमुखांसह इजिप्तचे अध्यक्ष अल सीसी हे प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. सर्व राष्ट्रप्रमुखांच्या दौऱयांमध्ये युक्रेन संकटाचा मुद्दा प्रमुख ठरणार आहे. युक्रेन संकटाप्रकरणी आंतरराष्ट्रीय समुदाय भारताकडून मोठय़ा भूमिकेची अपेक्षा करत आहे. याचबरोबर युक्रेन युद्ध जागतिक अन्नधान्य पुरवठा तसेच ऊर्जा सुरक्षेला प्रभावित करत आहे.
जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कोल्ज हे फेब्रुवारीमध्ये भारतात येणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांचा दौरा मार्चमध्ये प्रस्तावित आहे. फ्रान्सचे अध्यक्ष मार्चच्या पहिल्या आठवडय़ात भारतात दाखल होतील. राफेल लढाऊ विमान खरेदी केल्यावर भारत आता नौदलासाठी राफेलची दुसरी आवृत्ती प्राप्त करू पाहत आहे. अब्जावधींच्या या व्यवहारात फ्रान्सने विशेष स्वारस्य दाखविले आहे. भारताला 26 डेक आधारित लढाऊ विमानांची गरज आहे. फ्रान्सने स्वतःचे एक राफेल मरीन भारतात पाठविले आहे, भारतीय नौदलाने या लढाऊ विमानांच्या वैशिष्टय़ांची चाचपणी केली आहे. मॅक्रॉन यांच्या दौऱयादरम्यान राफेल लढाऊ विमानाच्या मरीन आवृत्तीच्या खरेदी कराराची घोषणा होऊ शकते.
फ्रान्सच्या अध्यक्षांचे कूटनीतिक सल्लागार इमॅन्युएल बॉन यांनी मागील आठवडय़ात भारताचा दौरा केला होता आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या दौऱयासाठीची पार्श्वभूमी तयार केली होती. यादरम्यान बॉन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी दीर्घ चर्चा केली होती. तसेच बॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली होती.
जर्मन चॅन्सेलरांना पहिला भारत दौरा
जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कोल्ज यांच्या प्रस्तावित भारत दौऱयादरम्यान द्विपक्षीय व्यापार, संरक्षण आणि हरित ऊर्जा तसेच हवामान बदलावर व्यापाक चर्चा होण्याची अपेक्षा आहे. डिसेबरमध्ये जर्मनीचे विदेशमंत्री अन्नालेना बेयरबॉक यांनी स्कोल्ज यांनी दीर्घकाळापासून प्रस्तावित दौऱयाच्या तयारीसाठी दोन दिवसांचा दिल्ली दौरा केला होता. यापूर्वी इंडोनेशियाच्या बालीमध्ये जी-20 बैठकीदरम्यान स्कोल्ज यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. 2021 मध्ये चॅन्सेलर पद स्वीकारल्यावर स्कोल्ज यांचा हा पहिला भारत दौरा असणार आहे.
ऑस्ट्रेलियासोबत सागरी सुरक्षेवर मंथ
ऑस्ट्रेलियासोबत सागरी सुरक्षेच्या क्षेत्रातील सहकार्य महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. मागील काही वर्षांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध बळकट झाले आहेत. दोन्ही देशांदरम्यान मागील महिन्यात मुक्त व्यापार करार लागू झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांचाही पहिलाच भारत दौरा असणार आहे.
मार्चमध्ये विदेश मंत्र्यांची बैठक
चालू वर्षात भारत जी-20 चे अध्यक्षत्व करत आहे. जगभरात भारताचे प्रभावक्षेत्र निर्माण करण्यासाठी या संधीचा मोठा लाभ होणार आहे. 1 आणि 2 मार्च राजी जी-20 च्या विदेशमंत्र्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. तर 2 मार्चपासून दिल्लीत रायसीना डायलॉगचे आयोजन होणार आहे.
प्रचंड अन् सलमान देखील दौऱयावर येणार
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड हे लवकरच भारताच्या दौऱयावर येणार आहेत. तर सौदी अरेबियाचे युवरज मोहम्मद बिन सलमान यांच्या भारत दौऱयाकरता पावले उचलली जात आहे.