हणजूण पोलीस स्थानकाची धडक कारवाई : बेकायदा खाटा, लोशन्स, ऑईल्स, वही जप्त,पार्लरवाल्यास अटक, जागा मालकाविरुद्ध गुन्हा
प्रतिनिधी /म्हापसा
पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक विक्रम नाईक यांनी काल सोमवारी हणजूण पोलीस स्थानकाचे प्रभारी म्हणून ताबा घेताच अवघ्या दोन तासाच्या आत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करत हणजूणेतील स्टार जंक्शनजवळ असलेल्या ‘होली बासिल ट्रेडिशनल आयुर्वेदिक सेंटर’ या मसाज पार्लरवर छापा टाकून एकास अटक केली. चार मसाज खाटा, विविध प्रकारच्या ऑईल्स, लोशन, हिशोबाच्या वहय़ा असे सामानही जप्त केले. ही कारवाई सुरु असताना अन्य पार्लरवाल्यांनी आपले ‘शटर डाऊन’ करुन तेथून पळ काढला.
हे मसाज पार्लर बेकायदेशीररित्या गेल्या चार वर्षापासून येथे कार्यरत होते. येथे येणाऱया पर्यटक व ग्राहकांमुळे त्यांना या अवैध धंद्यातून रोज लाखो रुपये मिळत होते. ग्राहकांकडून उकळण्यात येत असलेल्या पैशांच्या हिशोबाची वही पोलिसांना सापडली असून तिच्यातील आकडा पाहता महिन्याकाठी लाखो रुपयांच्या घरात जातो. विभागीय पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली काल सोमवार 6 रोजी नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांनी ही कारवाई केल्याने हणजूण भागात त्यांचे अभिनंदन होत आहे. उपनिरीक्षक तेजस कुमार नाईक यांचे त्यांना सहकार्य लाभले. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती निरीक्षक विक्रम नाईक यांनी ‘तरुण भारत’ला दिली.
रविवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी किनारी भागात बेकायदा मसाज पार्लर, डान्स बार आढळल्यास पोलिसांनी त्वरित कारवाई करावी असा आदेश दिला होता. त्या आदेशाला अनुसरून ही कारवाई करण्यात आली.
इतर मसाज पार्लरवाल्यांनी काढला पळ
या पार्लरवर छापा पडताच इतर बेकायदेशीररित्या चालणाऱया मसाज पार्लर धारकांनी आपले शटर बंद करून घटनास्थळावरून पळ काढला. अन्य एका मसाज पार्लरवर छापा घालणार याचा सुगावा लागताच त्यांनी आपले शटर बंद करून तेथून पळ काढला. यातून पोलीस खबरे मसाज पार्लरवाल्यांच्या कितपत संपर्कात आहेत हे, या छाप्यावेळी स्पष्ट झाले.
जागा मालक सांतान डिसोझाविरुद्ध गुन्हा नोंद
हे मसाज पार्लर आरोकियाराज कुली आतिसू हा (मूळ राहणारा तिरुवनमलाई तमिळनाडू) चालवत होता. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक केली आहे. पोलिसांनी त्या पार्लरची झडती घेतली असता तेथे पार्लरसाठी वापरणाऱया खाटा, ऑईल आदी सामान जप्त केले मात्र तो आवश्यक कागदपत्रे पोलिसांसमोर सादर करू शकला नाही. सदर जागा सोनाटो हणजूण येथील सांतान डिसौजा यांच्या मालकीची आहे. पोलिसांनी याबाबत अहवाल तयार करून जागेचे मालक व पार्लरच्या व्यवस्थापक विरोधात गुन्हा नोंद करून पुढील चौकशीसाठी बार्देश उपजिल्हाधिकाऱयांकडे पाठवून दिली आहे.
मुख्यमंत्री खरोखरच अधिकाऱयांवर कारवाई करणार?
गेल्या चार वर्षाच्या कालावधीत 6 मार्च 2019 ते 9 जानेवारी 2022 या चार वर्षाच्या कालावधीत या पोलीस ठाण्यावर चेतन पाटील, नवलेश देसाई, सुरज गावस आणि आता जानेवारी ते जूनपर्यंत प्रशल देसाई निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. शिवाय येथे एलआयबी, बीट पोलीस काम पाहत आहेत. पोलिसांची दरदिवशी या बाजूनी ये-जा असते, मात्र अशा बेकायदेशीर मसाज पार्लरकडे या पोलिसांचे लक्ष कसे गेले नाही हे प्रश्नचिन्ह आहे. या भागात विविध मसाज पार्लर बेकायदेशीररित्या सुरू असून यात अनेक गैरकृत्ये गैरव्यवहार सुरू आहे मग यावर पोलिसांचे छापे का पडले नाही असाही प्रश्न निर्माण होत असून आता मुख्यमंत्री खरोखरच या पोलीस अधिकाऱयांवर कारवाई करणार आहेत काय? असा प्रश्न चर्चिला जात आहे.
केवळ पोलिसांवरच ठपका न ठेवता अन्य अधिकाऱयांवरही कारवाई व्हावी
या मसाज पार्लर धारकाकडे आरोग्य खात्याचा दाखला, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना, पंचायत परवाना, व्यवसाय परवाना, भाडेपट्टीवर दिलेली कागदपत्रे, पंचकर्मा परवाना, कामगार परवाना असणे आवश्यक आहे मात्र या होली बासिल आयुर्वेदकि सेंटरच्या व्यवस्थापकाकडे कोणतीच कागदपत्रे नव्हती असे चौकशीत आढळून आले. मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशीर मसाज पार्लर आढळल्यास संबंधित पोलीस निरीक्षकावर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला असला तरी वरील हे सर्व परवाने नसतानाही धंदा सुरु होता. या सर्व संबंधीत खात्यातील सरकारी अधिकारी झोपा काढतात काय हा प्रश्न निर्माण होतो. पंचायत, सरपंच, सचिव या गैरधंद्याना पाठिंबा देतात काय, हे सुद्धा तपासून पहावे लागेल. आरोग्य अधिकारीवर्ग अशा गैरकृत्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत नाही ना, असाही सवाल या छाप्या दरम्यान उपस्थित झाला. या बेकायदेशीर धंद्यांना पोलिसांबरोबर वरील खात्यातील सर्व अधिकारीही जबाबदार आहेत. त्यामुळे केवळ पोलिसांवरच ठपका न ठेवता वरील अधिकाऱयांवरही कारवाई व्हायला हवी, असा सूर या छाप्यावेळी हजर असलेल्या नागरिकांमधून व्यक्त झाला.
गैरकृत्याबाबत कुणाचीही गय नाही : निरीक्षक विक्रम नाईक
हणजूण पोलीस स्थानकाचा पदभार सांभाळणारे निरीक्षक प्रशल देसाई 27 जूनपर्यंत रजेवर गेले आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक सुबीत सक्सेना यांनी हणजूणचा अतिरिक्त ताबा पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक विक्रम नाईक यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांनी हणजूणमध्ये ताबा घेताच अवघ्या दोन तासाच्या आत बेकायदेशीर मसाज पार्लरवर छापा मारुन संशयितास अटक केली. या हद्दीतील सर्व बेकायदेशीर पार्लर बंद केले जातील, असा ठाम निर्धार त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच अधीक्षक सुबीत सक्सेना, उपअधीक्षक जिवबा दळवी यांनीही आपला पाठिंबा त्यांना दिला आहे. पेडणे, मांद्रे हे दोन मतदारसंघ शिवाय गोवा बॉर्डर पत्रादेवी, केरी, मोपा हा परिसर निरीक्षक विक्रम नाईक यांच्या हद्दीत येतो. अवघे 75 पोलीस घेऊन ते पेडणेहून दोन मतदारसंघाचा ताबा पाहत आहेत. पेडण्यात तीन पटीने पोलीसवर्गाची आवश्यकता आहे.
बेकायदा रेती उत्खननाविरुद्ध त्यांनी धडक कारवाई करीत रेती ट्रक तसेच रेती व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करून पोलीस खात्यात आपली वेगळी प्रतिमा तयार केली आहे. काही राजकीय धेंडांनी मंत्र्याचे वजन वापरून त्यांची अन्यत्र बदली करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेल्या आदेशामुळे त्यांच्या विरुद्ध कुणाचीही डाळ शिजू शकली नाही. त्यांनी आता हणजूणचा पदभार हाती घेतल्याने सर्वांचे धाबे धणाणले आहे. बेकायदेशीर गैरकृत्यांना आपण थारा देणार नाही, असे निरीक्षक विक्रम नाईक यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.