माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे गौरवोद्गार : अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थिती
प्रतिनिधी /बेळगाव
तळागाळातील उपेक्षित, होतकरू लोकांना आर्थिक साहाय्य मिळावे, या हेतूने सव्वाशे वर्षांपूर्वी सहकार चळवळ निर्माण झाली. सहकारी बँकांमुळे आर्थिक सुबत्ता आली. मराठा को-ऑप. बँकेने बेळगाव परिसरातील उद्योग, शेती, शेतीपूरक व्यवसाय उभे केले. बहुजनांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली. यामुळेच आज अनेक उद्योजक घडू शकले. 75 वर्षांत विधायक दृष्टिकोन ठेवून चाललेल्या या बँकेने एक आदर्श घडविला, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले.
मराठा को-ऑप. बँकेचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम बुधवारी बसवाण गल्ली येथे पार पडला. या सोहळय़ात पवार बोलत होते. कॉ. कृष्णा मेणसे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, व्हा. चेअरमन निना काकतकर, बाळाराम पाटील, बाळासाहेब काकतकर, बाबुराव पाटील, विनोद हंगिरकर, सुशीलकुमार खोकाटे, सुनील अष्टेकर, दीपक दळवी, लक्ष्मण होनगेकर, शेखर हंडे, मोहन चौगुले, रेणू किल्लेकर, लक्ष्मण नाईक उपस्थित होते.
बँकेची प्रगती कशी सुरू आहे, हे त्या बँकेच्या एनपीएवर ठरते. ज्या बँकांचे एनपीए 8 ते 9 टक्क्मयांपर्यंत पोहोचले आहेत, त्या बँका दिवाळखोरीच्या जवळ आहेत, असे समजावे. मराठा बँकेचा एनपीए पाहिल्यास त्यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते. बँकेचा शून्य एनपीए असल्यामुळे कर्जदार नियमितपणे कर्ज भरत असल्याचे दिसून येते. ज्ये÷, सर्वसामान्य खातेदारही आपली बँक असे समजतो तेव्हा बँकेची प्रगती होते. केवळ सुटाबुटात येणाऱयांपेक्षा खेडय़ापाडय़ातील गरजूंना मदत केल्यास बँक मोठी होते, असे त्यांनी नमूद केले.
जागतिक पातळीवरील उद्योजक बेळगावमध्ये घडावेत
शरद पवार यांचे बेळगावमधील अनेकांशी जिव्हाळय़ाचे नाते असल्याने येथील उद्योग, शेती, सहकार या क्षेत्रांविषयी त्यांना आस्था असल्याचे जाणवले. बेळगावमध्ये ट्रक बॉडीबिल्डिंगचा व्यवसाय विस्तारलेला असल्याने यातून मोठे उद्योजक तयार व्हावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. दक्षिण कोरियातील चांग से यंग हे पूर्वी चेस्सी बनवत होते. त्यानंतर त्यांनी प्रयोग करत वाहन निर्मिती उद्योग सुरू केला. आज जगभरातील प्रत्येक देशात त्यांच्या हुंडाई कंपनीची शोरूम आहे. असेच प्रयोग बेळगावमधील ट्रक बॉडीबिल्डर व्यावसायिकांनी करावेत, असे ते म्हणाले.
चेअरमन दिगंबर पवार म्हणाले, एकमेकांना साहाय्य करण्यासाठी सहकार क्षेत्र उभे राहिले. बँकेने गरजू लोकांना आर्थिक पतपुरवठा करीत अनेकांना रोजगार मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. सीमाभाग शरद पवार यांच्याकडे आशेने पाहत असून त्यांच्या सहकार्यानेच बेळगावमध्ये अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने स्पर्धा परीक्षांसाठी सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या सवलती काढून घेतल्याबद्दल ज्ये÷ संचालक दीपक दळवी यांनी नाराजी व्यक्त केली. प्रारंभी बँकेच्या मुख्य कार्यालयात फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शिवशिल्पाचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
संचालक बाळासाहेब काकतकर यांनी बँकेच्या प्रगतीचा आलेख मांडत सर्व माजी संचालक, ठेवीदार, कर्जदार व कर्मचाऱयांच्या मदतीने बँकेची प्रगती झाल्याचे सांगितले. शरद पवार यांचा बँकेच्यावतीने सन्मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला. कॉ. कृष्णा मेणसे यांचाही सत्कार करण्यात आला. अमृतमहोत्सव स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लक्ष्मण होनगेकर, शिवबाळ खोकाटे, नागेंद्र हैबत्ती, नागेश झंगरूचे या चार ज्ये÷ सभासदांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. मायाप्पा पाटील यांनी केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणला…
सीमाप्रश्नाच्या प्रत्येक लढय़ात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सहभागी झाले आहेत. त्यांनी सीमाप्रश्न अत्यंत जवळून हाताळला आहे. त्यामुळेच ते भाषणाला उभे राहताच सीमावासियांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा देताच मराठी भाषिकांत नवचैतन्य पसरले.