बेनके स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित अनिल बेनके चषक निमंत्रितांची अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा


क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
अनिल बेनके स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित पाचव्या अनिल बेनके चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स संघाने शिव इलेव्हन खानापूरचा 5 गड्यांनी, अयोध्या कडोलीने हुक्केरी स्टारचा 8 गड्यांनी तर फौजी इलेव्हनने सरदार वॉरियर्सचा 56 धावांनी पराभव करुन पुढील फेरीत प्रवेश केला. दीपक नार्वेकर, गजानन झडमाळे, समीर यळ्ळूरकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सरदार्स हायस्कूल मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात शिव इलेव्हन खानापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 6 गडी बाद 82 धावा केल्या. त्यात संकल्प शिंदेने 33, सुजित पाटीलने 22, विशाल हांजीने 12 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्सतर्फे समीर यळ्ळूरकर, सुशांत कोवाडकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मराठा स्पोर्ट्सने 7.3 षटकात 5 गडी बाद 86 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात समीर यळ्ळूरकरने 28, दत्तप्रसाद जांभवलेकरने 22 तर नवीन हंचिनमणीने 19 धावा केल्या. खानापूरतर्फे साई गोवेकर व नामदेव गुरव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात हुक्केरी स्टारने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 7 गडी बाद 86 धावा केल्या. त्यात अस्कर नाईकवाडीने 43, नईम मोकाशीने 18 तर सद्दाम मकानदारने 10 धावा केल्या. कडोलीतर्फे गजानन झडमाळेने 21 धावात 5 तर प्रथमेश डोंगरेने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अयोध्या कडोलीने 6.4 षटकात 2 गडी बाद 89 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात अजिंक्य भोसलेने 34, गजानन झडमाळेने 31 तर आकाश कटांबळेने 15 धावा केल्या.


तिसऱ्या सामन्यात फौजी इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 7 गडी बाद 105 धावा केल्या. त्यात विरेश गौडरने 29, दीपक नार्वेकरने 27, अमोल यल्लुपाचेने 22 तर विनोद पाटीलने 11 धावा केल्या.
सरदारतर्फे राहुल पाटील, रोहित मुरकुटे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सरदार वॉरियर्सचा डाव 8.5 षटकात 49 धावात आटोपला. त्यात राहुल पाटीलने 18 धावा केल्या. फौजीतर्फे दीपक व सागर यांनी प्रत्येकी 3, उमेशने 2 तर अमोलने 1 गडी बाद केला.
बुधवारचे सामने
1) जीजी बॉईज वि. आर्मी इलेव्हन स. 9 वा. 2) एवायएम ए वि. एसएसएस फौंडेशन कणबर्गी स. 11 वा. 3) इंडियन बॉईज बेळगाव वि. पहिल्या सामन्यातील विजेता. दु. 12.45 वा. 4) मराठा स्पोर्ट्स वि. दुसऱ्या सामन्यातील विजेता दु. 2.30 वा.