Tarun Bharat

मराठी कागदपत्रांसाठी मराठी बाणा

Advertisements

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा : घोषणांनी परिसर दणाणला : युवावर्ग सीमालढय़ात पुन्हा सक्रिय

प्रतिनिधी /बेळगाव

घटनेनुसार आम्हाला मराठीत कागदपत्रे द्यावीत, या मागणीसाठी मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा भव्य मोर्चा काढून आपली मराठी अस्मिता दाखवून दिली. आम्हाला लोकशाहीनुसारच आमच्या भाषेतून परिपत्रके द्या, अन्यथा पुन्हा भविष्यात मोर्चा काढून आपल्या न्याय हक्कासाठी हिसका दाखवू, असा इशारा जिल्हाधिकाऱयांना निवेदनाद्वारे दिला आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी कागदपत्रांसाठी सोमवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. भाषिक अल्पसंख्याक म्हणून मिळणाऱया अधिकारापासून सीमावासियांना डावलले जात आहे. 1 जून रोजी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन मराठी कागदपत्रे देण्यासाठीची मागणी करण्यात आली होती. परंतु प्रशासनाकडून कोणतीही हालचाल नसल्याने अखेर मोर्चा काढण्याची तयारी करण्यात आली.

सोमवारी सकाळपासूनच सरदार्स हायस्कूल मैदानावर मराठी भाषिक जमा होत होते. बेळगाव शहरासह तालुका व खानापूर येथून मराठी भाषिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हातात भगवे ध्वज घेऊन संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा कार्यकर्ते देत होते. ‘रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा खुर्च्या खाली करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

पोलिसांकडून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न

सरदार्स हायस्कूल मैदान येथून मोर्चा बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांनी सन्मान हॉटेलकडून जाण्यास सुरुवात केली. परंतु पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे पोलीस व पदाधिकाऱयांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. काही पोलिसांनी विनंती केल्यामुळे अखेर येथून चन्नम्मा चौकाकडे मोर्चा निघाला. पुरुषांसह महिलांचीही उपस्थिती मोठी होती. युवावर्ग सीमाप्रश्नाच्या लढाईत पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे या मोर्चातून दिसून आले. शांततेच्या मार्गाने निघालेल्या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगता झाली.

जिल्हाधिकारी नितेश पाटील अनुपस्थित असल्याने शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी म. ए. समितीच्या पदाधिकाऱयांनी त्यांना भाषिक अल्पसंख्याक म्हणून देण्यात आलेले अधिकार याविषयी माहिती दिली. सीमाभागात या भाषिक अधिकारांची पायमल्ली होत असून, मराठीत कागदपत्रे न दिल्यास यापुढील काळात उग्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱयांना देण्यात आला. सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या 15 टक्क्मयांहून अधिक असल्यामुळे त्यांना मराठीतून कागदपत्रे देणे गरजेचे आहे. परंतु भाषिक अधिकारापासून डावलले जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

मोर्चाची प्रशासनाला धास्ती

म. ए. समितीचा मोर्चा होऊ नये, यासाठी सुरुवातीपासूनच आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु समितीने विरोध न जुमानता सोमवारी भक्य मोर्चा काढला. मोर्चामध्ये नागरिक सहभागी होऊ नयेत यासाठी कॉलेज रोड व सरदार्स हायस्कूल मैदानावर पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता. राणी चन्नम्मा चौक येथे तर दंगल रोखण्यासाठी वापरली जाणारी वाहने लावण्यात आली होती. प्रशासनाने धास्ती घेतल्यामुळेच इतका फौजफाटा ठेवण्यात आला होता. तसेच ड्रोन कॅमेऱयाद्वारे मोर्चावर लक्ष ठेवण्यात आले होते.

मोर्चामध्ये मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेविका वैशाली भातकांडे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, महिला आघडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, वर्षा आजरेकर, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, आर. आय. पाटील, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी नगरसेवक नेताजी जाधव, सुहास किल्लेकर, मदन बामणे, सूरज कुडुचकर, अंकुश केसरकर, मनोहर हुंदरे, विनायक कावळे, सिद्धार्थ चौगुले, आनंद पाटील, प्रथमेश मण्णूरकर, किरण मोदगेकर, प्रवीण रेडेकर, सचिन केळवेकर, नारायण मुचंडीकर, शांताराम कुडची, दुदाप्पा बागेवाडी, माजी ता. पं. सदस्य रावजी पाटील, रमेश मेणसे, राकेश परिट, राजू पावले, दयानंद उघाडे, भरत मासेकर, आनंद मजुकर, दशरथ पाटील, परशराम घाडी, माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, यशवंत बिर्जे, आबासाहेब दळवी, देवाप्पा घाडी गुरुजी, डी. एम. भोसले, शामराव पाटील, नारायण कापोलकर, नारायण पाटील, शिवाजी पाटील, विलास बेळगावकर, कृष्णा कुंभार, रुक्माण्णा झुंझवाडकर, तुकाराम जाधव, विठ्ठल गुरव, गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, मारुती परमेकर, पांडुरंग सावंत, सूर्याजी पाटील, निरंजन सरदेसाई, रवी शिंदे, धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, सदानंद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

जिल्हाधिकारी कार्यालय भागात रस्त्यांची दुर्दशा

Amit Kulkarni

उज्ज्वलनगर येथील नाल्यावर अतिक्रमण

Amit Kulkarni

अखेर कॅम्प येथे रहदारी पोलीस तैनात

Amit Kulkarni

कर्नाटक : पीएम मोदींचा बोम्माईंना फोन, पूर परिस्थितीवर चर्चा

Sumit Tambekar

कचरावाहू वाहन ताफ्यात ई-ऑटोटिप्पर दाखल

Omkar B

निम्म्या मालमत्ताधारकांची थकली घरपट्टी

Amit Kulkarni
error: Content is protected !!