महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन : बेळगावला दिली धावती भेट
प्रतिनिधी /बेळगाव
मराठी नाटक व सांस्कृतिक कार्यक्रम अतिरिक्त कराच्या बोजामुळे बेळगावपर्यंत पोहोचत नाहीत. यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या बेळगावचे नुकसान होत असून भाषेच्या संवर्धनालाही धोका पोहोचत आहे. त्यामुळे मराठी नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम बेळगावपर्यंत आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
सोमवारी मंत्री दीपक केसरकर बेळगावमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मराठी नाटक बेळगावमध्ये येत असताना कर्नाटक सरकारकडून त्यावर कराचा बोजा लादला जातो. हा कर महाराष्ट्र सरकारकडून भरला जाण्यासाठी प्रयत्न केले जात असून, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच या संदर्भात बैठक घेणार असल्याचेही ते म्हणाले.
सीमाभागात महाराष्ट्र सरकार योजना राबविणार
नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या योजना सीमाभागात राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी आरोग्यासह इतर सुविधा राबविण्यासाठी अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू आहे. या सुविधांमुळे सीमाभागातील हजारो मराठी भाषिकांना लाभ होईल, असे दीपक केसरकर म्हणाले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन मागील दोन महिन्यांमध्ये घडलेल्या घटना त्यांच्या समोर मांडल्या. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, अॅड. एम. जी. पाटील, तालुका पंचायत माजी सदस्य सुनील अष्टेकर, शंकर बाबली यासह इतर उपस्थित होते.