प्रतिनिधी /पणजी
मागील काही वर्षांपासून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा गोवा मराठी चित्रपट महोत्सव कोरोना काळाच्या सुमारे दोन वर्षानंतर मराठी रसिकांच्या भेटीला 5 रोजीपासून येत आहे. गेल्या पंधरा वर्षात गोव्यात सातत्याने हा महोत्सव पणजीत साजरा होतो. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे गेली दोन वर्षे ह्या महोत्सवात खंड पडला. गोवा, सिंधुदुर्ग तसेच बेळगाव व कारवार मधील मराठी चित्रपटप्रेमी मोठय़ा आतुरतेने वाट पहात असतात.
मुख्यमंत्र्यांच्याहस्ते होणार उद्घाटन
विन्सन वर्ल्ड आयोजित आय एफ बी पुरस्कृत 13वा गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दि. 5 रोजी सायं. 5.30 वा. आयनॉक्स येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हे प्रमुख पाहुणे असतील. तसेच पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहीत मोन्सेरात हे देखील विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळीही या महोत्सवात असणार आहे. सदर महोत्सव दि. 5 रोजी ते 7 रोजी असा तीन दिवस चालणार असून रसिकांकडून प्रतिनिधी नोंदणीला उस्फुर्त प्रतिसाद लाभत असल्याचे विन्सन वर्ल्डचे प्रमुख संजय शेटय़े यांनी सांगितले.
‘सहेला रे’ चित्रपटाने उघडणार महोत्सवाचा पडदा
यंदा कला अकादमी थिएटर उपलब्ध नसल्यामुळे आयनॉक्स व मॅकेनिज पॅलेसच्या चार सिनेगृहांमध्ये हा महोत्सव चालणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतले नामवंत अभिनेता अशोक सराफ यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देवून कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येईल. या समयी अशोक सराफ यांच्या पत्नी व गुणी अभिनेत्री निवेदिता सराफ याही व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळय़ानंतर ‘सहेला रे’ ह्या सिनेमाचा वर्ल्ड प्रिमियर शो होणार आहे. ह्या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी याचं असून त्यांच्यासह सुमित राघवन, सुबोध भावे यांच्या प्रमुख भुमिका आहेत.
मराठी दिग्गज कलाकारांची असणार मांदियाळी
दरवषीप्रमाणे यंदाही मराठी चित्रपट जगतातील मान्यवर कलाकार महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. नीना कुलकर्णी, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, उमेश कामत, प्रसाद ओक, मंजिरी प्रसाद ओक, छाया कदम, अभिषेक करगुटकर, प्रशांत पवार, विजय मुणशिंगीवार, आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर, गजेंद्र अहिरे, संजय जाधव, किशोर कदम, मृण्मयी गोडबोले, सुव्रत जोशी, मिलिंद गुणाजी, मयुर बोरकर, शंकर धोत्रे, हेमांगी कवी, प्रियदर्शन जाधव, जितेंद्र जोशी, भारती दुबे, नेहा पेंडसे, रसिका आगाशे, स्मिता तांबे, सुमित तांडेल, मोहन आगाशे, पार्थ भालेराव, संतोष पाठारे, मृण्मयी देशपांडे, शिवानी रणगोळे, रुता दुरगुले, अभय मंगेश भालेराव, बद्रापुरकर, मनाली दीक्षित आदी मान्यवर कलाकार यंदा तीनही दिवस महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवात 21 चित्रपट व चार प्रीमियर शो
ह्या महोत्सवात एकूण एकवीस मराठी सिनेमा व कान्स महोत्सवात जावून आलेला कोंकणी लघुपट ‘वागरो’ प्रदर्शित होणार आहे. नामवंत गोमंतकीय अस्थिरोगतज्ञ डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्यावर आधारीत ‘ताठ कणा’ हा सिनेमाही दाखवला जाणार आहे. ह्या प्रयोगाला डॉ. रामाणी स्वतः हजर राहणार आहेत. याशिवाय यंदाच्या महोत्सवात चार नव्या कोऱया चित्रपटांचा प्रिमियर शो असेल. उद्घाटनाला मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ चित्रपट असेल तर समारोपाला तानाजी घाडगे दिग्दर्शित ‘पिल्लू बॅचलर’ चित्रपटाचा प्रिमियर शो असेल. तसेच शनिवारी ओंकार बर्वे यांचा ‘दीड’ सिनेमाचा आशिया प्रिमियर व सुहास जोशी यांच्या ‘क्रिप्टो आजी’ सिनेमाचा वर्ल्ड प्रिमियर असेल.
अशोक सराफ यांना कृतज्ञता सन्मान
ज्ये÷ अभिनेते आणि मराठी नाटय़-चित्रपटसृष्टीतील महानायक अशोक सराफ अनेक दशकं मराठी रसिक प्रेक्षकांचे आपल्या अभिनयाद्वारे मराठी चित्रपटसृष्टी वर अधिराज्य गाजवलेल बहुरंगी, बहुरूपी व बहुढंगी अशी त्यांची अजस्त्र कारकीर्द. यंदा त्यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. तसेच त्यांचे गोव्याशी खास नातं आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात त्यांचा कृतज्ञता सन्मान देवून गौरव करण्यात येणार आहे. अशोक सराफ यांना 5 फिल्मफेअर पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाले आहेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्या संयोजनाने 1985 पासून मराठी चित्रपटसृष्टीत ‘कॉमेडी चित्रपटांची लाट’ निर्माण केली जी एक दशकाहून अधिक काळ टिकली. मुख्य नायक म्हणून त्याच्या यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये एक डाव भुताचा, धूम धडका, गंमत जम्मत, अशी ही बनवा बनवी आणि वझीर यांचा समावेश आहे. सराफ ह्यांनी ये छोटी बडी बातें आणि हम पांच यांसारख्या टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केले आहे. असंख्य सिनेमांमधून ते प्रेक्षकांना अप्रत्यक्षपणे भेटले आहेत. हम पाच ही त्यांची मालिकाही खूप लोकप्रिय झाली होती. सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे या कलाकारांसोबत काम करताना त्यांनी अनेक अजरामर चित्रपट तयार करुन रसिकांचे मनोरंजन केले.
गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे यंदा तेरावे वर्ष आहे. यंदाच्या महोत्सवात चार नव्या कोऱया चित्रपटांचा शुभारंभी प्रयोग म्हणजेच प्रिमियर शो होणार आहेत. उद्घाटनानंतर पहिला प्रिमियर ’सहेला रे’ चित्रपटाचा होणार असून ह्या सिनेमात सुमित राघवन, सुबोध भावे व मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांचे आहे.
शनिवार दि. 6 रोजी सायं. 5 वा. मॅकेनिझ पॅलेस सिनेगृहात ओमकार बर्वे दिग्दर्शित ’दीड’ सिनेमाचा आशिया प्रिमियर दाखवला जाणार आहे. ह्या चित्रपटात केतकी नारायण, रेणुका दफ्तरदार, श्रेयस कोटा व शिवराज वायचल यांच्या भुमिका आहेत. तसेच सायं. 7 वा. मॅकेनिज पॅलेस येथे सुहास जोशी यांची मध्यवर्ती भूमिका असलेला ’क्रिप्टो आजी’ ह्या अमित अग्रवाल दिग्दर्शित चित्रपटाचा जागतिक प्रिमियर होईल. चित्रपटातील इतर कलाकारांमध्ये शिवानी टांकसाळे व अनिकेत विश्वासराव यांचा समावेश आहे. समारोपाच्या कार्यक्रमात ’पिल्लू बॅचलर’ ह्या चित्रपटाचा प्रिमियर शो दाखवला जाणार आहे. सुनिल फडतरे, तानाजी घाडगे, मोहन आगाशे, सयाजी संजीव व शशांक शेंडे यांच्या प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट लक्ष्मण गुट्टे यांनी दिग्दर्शित केला आहे.
विन्सन वर्ल्ड’ चे चित्रविश्व
वास्को शहरातील ’विन्सन वर्ल्ड’ चे प्रमुख संजय शेटय़े व त्यांचे बंधू श्रीपाद शेटय़े गेली तीन दशके पर्यटन, हॉटेल, कार्यक्रम व्यवस्थापन व्यवसायात कार्यरत आहेत. मनोरंजन व्यवसायात त्यांनी आजवर कोंकणी तसेच मराठी सिनेमा व व्यावसायिक मराठी नाटकांचीही निर्मिती केली आहे. त्यांनी निर्मित केलेला ’स्थलपुराण’ हा सिनेमा 2020 साली बर्लिन चित्रपट महोत्सवात दाखवण्यासाठी निवडण्यात आला होता.
गोवा मराठी चित्रपट महोत्सव हा संजय शेटय़े यांचा जिव्हाळय़ाचा विषय. गोव्यातील मराठी चित्रपट रसिकांना चांगले मराठी चित्रपट पाहायला मिळत नाहीत अशी कित्येक वर्षे त्यांना खंत होती. त्यासाठी त्यांनी समविचारी मित्रांना बरोबर घेवून गोव्यात असा एखादा चित्रपट महोत्सव घडवून आणावा असा विचार पुढे आणला आणि स्वतःच पुढाकार घेवून ही कल्पना प्रत्यक्षात आणली. 2008 साली सुरु छोटय़ा प्रमाणात करण्यात आलेल्या ह्या महोत्सवाला रसिकांनी व सिनेक्षेत्रातील दिग्गजांनी भरघोस पाठिंबा दिल्यामुळे महोत्सवाने लगेच बाळसे धरले. बारा वर्षे सातत्याने आयोजन घडविल्यानंतर 2020 आणि 2021 अशी दोन वर्षे जागतिक महामारीचे संकट ओढवल्याने महोत्सवात खंड पडला. यंदा सर्वत्र सार्वजनिक कार्यक्रम सुरु झाल्यामुळे रसिकांकडून वारंवार विचारणा होवू लागली. कला अकादमी सिनेगृह सध्या नुतनीकरणास्तव बंद असल्याने थोडी अडचण जरुर झाली. परंतु त्याही अडचणीवर मात करत तेरावा महोत्सव शुकवार दि. 5 रोजीपासून पणजीत सुरू होत आहे.
‘विन्सन वर्ल्ड’ ह्या आघाडीच्या गोमंतकीय संस्थेच्या पुढाकाराने आयोजित होत असलेल्या ह्या महोत्सवाचे ‘आय एफ बी मोडय़ुलर किचन’ मुख्य प्रायोजक असून चित्रपट महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी वास्को व पाटो, पणजी येथील विन्सन ग्राफिक्सच्या कार्यालयात तसेच फोंडा येथे मोहक डिजायन, म्हापशात भारत कॅनवास मर्चंट व मडगांवला माया बुक स्टोअर्समध्ये सुरु आहे. तसेच ऑनलाईन बुकींग गोवा ऍप व बुक माय शोवर सुरु आहे.
दाखवण्यात येणारे चित्रपट
- चित्रपट : सहेला रे
- दिग्दर्शक : मृणाल कुलकर्णी
- चित्रपट : ताठ कणा
- दिग्दर्शक : गिरीश मोहीते
- चित्रपट : पोटरा
- दिग्दर्शक : शंकर धोत्रे
- चित्रपट : झोंबिवली
- दिग्दर्शक : आदित्य सरपोतदार
- चित्रपट : गोदाकाठ
- दिग्दर्शक : गजेंद्र अहिरे
- चित्रपट : सुमित्रा भावे- एक समांतर प्रवास
- दिग्दर्शक : डॉ. संतोष पाठारे
- चित्रपट : मी वसंतराव
- दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी
- चित्रपट : तिचं शहर होणं
- दिग्दर्शक : रसिका आगाशे
- चित्रपट : गोदावरी
- दिग्दर्शक : निखिल महाजन
- चित्रपट : टायम पास – 3
- दिग्दर्शक : रवी जाधव
- चित्रपट : वाय
- दिग्दर्शक : अजित वाडीकर
- चित्रपट : ये रे ये रे पावसा
- दिग्दर्शक : शफाक खान
- चित्रपट : चंद्रमुखी
- दिग्दर्शक : प्रसाद ओक
- चित्रपट : गोष्ट एका पैठणीची
- दिग्दर्शक : शंतनू रोडे
- चित्रपट : दीड
- दिग्दर्शक : ॐकार बर्वे
- चित्रपट : जून
- दिग्दर्शक : सुह्रद गोडबोले / वैभवी खिस्ती
- चित्रपट : क्रिप्टो आजी
- दिग्दर्शक : अमित अगरवाल
- चित्रपट : कडू गोड
- दिग्दर्शक :अनंत महादेवन
- चित्रपट : तमाशा लायव्ह
- दिग्दर्शक : संजय जाधव
- चित्रपट : पाँडिचेरी
- दिग्दर्शक : सचिन कुंडलकर
- चित्रपट : वागरो (कोंकणी)
- दिग्दर्शक : साईनाथ उसकयकार
चार राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमा
मी वसंतराव, जून, गोदाकाठ आणि गोष्ट एका पैठणीची असे यंदाचे चार राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येतील. तसेच पुरस्कार विजेत्या कलाकारांचा उद्घाटनाच्या कार्यक्रमात सत्कार केला जाणार आहे.