वार्ताहर/खानापूर
जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीला 30 वर्षे पूर्ण झाल्याने खानापुरात गुऊवार दि. 8 रोजी सकाळी 7 वा. जवळपास 20 कि.मी.अंतर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग दर्शवावा, असे आवाहन सोसायटीचे चेअरमन विलास बेळगावकर यांनी येथील शिवस्मारकात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेबद्दल बोलताना ते म्हणाले, खानापूर येथील जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीच्या शाखा कार्यालयापासून मॅरेथॉनला सुऊवात होणार असून मोदेकोपपर्यंत व पुन्हा मॅरेथॉन सुऊवातीच्या ठिकाणी संपणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकाला 11000 रू., द्वितीय 8000 रू., तृतीय क्रमांकाला 6000 रू. व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा राज्य अथेलेटिक मॅरेथॉन स्पर्धेच्या नियमानुसार राहणार आहे. स्पर्धा फक्त पुऊषांसाठी आहे. ही स्पर्धा आयोजन करण्यासाठी विश्वभारती सेवा क्रीडा कला संघाचेही सहकार्य लाभणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना दि. 9 रोजी काणकोण-गोवा येथे होणाऱ्या लोकोत्सव कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट देण्यात येणार आहेत. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला जांबोटी सोसायटीचे व्हाईस चेअरमन पुंडलिक नाकाडी, संचालक मनोहर डांगे, यशवंत पाटील, माऊती मादार, विद्याधर बनोशी, खाचाप्पा काजुनेकर, दिलीप हन्नुरकर, विश्वभारती क्रीडा कला संघाचे अनिल देसाई, दामोदर कणबरकर, भैरू पाटील, विनोद गुरव, लक्ष्मण कोलेकर, कृष्णा खांडेकर, गणपत गावडे, भुजंग कामती आदींसह अन्य उपस्थित होते.