प्राप्तिकर विभागाकडून सार्वजनिक सूचना जारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आधार कार्डशी लिंक नसलेले पॅन 31 मार्च 2023 नंतर निष्क्रिय केले जातील, असा इशारा प्राप्तिकर विभागाने शनिवारी एका सार्वजनिक सूचनेद्वारे जारी केला आहे. पॅनकार्ड क्रमांक आधार नंबरशी लिंक करणे अनिवार्य असल्याचेही प्राप्तिकर विभागाकडून सांगण्यात आले. साहजिकच 1 एप्रिल 2023 पूर्वी ही जोडणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
आधारशी लिंक न केलेले पॅन कार्ड (कायम खाते क्रमांक) 31 मार्च 2023 नंतर निष्क्रिय केले जाणार असल्याने दोन्ही क्रमांक लिंक न केलेल्या लोकांनी ते लवकरात लवकरच लिंक करणे आवश्यक आहे. प्राप्तिकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅन धारकांसाठी हे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत या जोडणीसाठी बऱयाचवेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, आता या जोडणीसाठी मुदतवाढ मिळणार नसल्याचे दिसत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मे 2017 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आसाम, जम्मू-काश्मीर आणि मेघालय या राज्यांमध्ये राहणाऱया लोकांना आधार-पॅन क्रमांक जोडणीतून सूट देण्यात आली आहे.
सीबीडीटी प्राप्तिकर विभागासाठी धोरण तयार करते. भारतीय रहिवाशांना आधार क्रमांक भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे जारी केला जातो. तर पॅनकार्ड नंबर हा 10-अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक असून तो आयटी विभागाने एखाद्या व्यक्ती, फर्म किंवा संस्थेला दिलेला ‘कायम खाते क्रमांक’ असतो. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनुसार (सीबीडीटी) पॅन क्रमांक निष्क्रिय झाल्यास अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. संबंधितांच्या आर्थिक देवघेव व्यवहारांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच कोणतीही व्यक्ती निष्क्रिय पॅन वापरून आय-टी रिटर्न दाखल करू शकणार नाही.