मडगावातील अनेक कॅमेरे दुरुस्त करण्याची वा बदलण्याची गरज
प्रतिनिधी /मडगाव
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर तसेच गुन्हेगारी कृत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱयांची आवश्यकता व्यक्त केली जाते. राज्यात सध्या वाढत्या अपघातांची शृंखला सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कॅमेऱयांचे महत्त्व पुन्हा समोर आले आहे. मात्र मडगाव पालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या ठिकाणी बसविलेले आणि सध्या नादुरुस्त स्थितीत असलेले कॅमरे दुरुस्त करण्यासाठी वा बदलण्यासाठी कोणी पुरस्कर्ता पुढे येतो काय याच्या प्रतीक्षेत मडगाव पालिका असून यावरून सरकार दरबारी आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.
खासदार निधीतून मडगाव पालिका क्षेत्रात काही महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात आले होते. त्यानंतर सदर कॅमेऱयांची व्यवस्थित देखभाल झाल्याचे दिसून येत नाही. मडगाव पालिकेने ठराव घेऊन खासदार निधीतून ते बसविण्यात आल्याने त्यांच्यावर देखरेखीची जबाबदारी पालिकेकडे येत होती.
वाहतूक पोलिसांनी या कॅमेऱयांच्या आधारे कित्येकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावले होते. मध्यंतरी बहुतेक कॅमेरे चालत नसल्याचे वाहतूक विभागाने वरिष्ठांना तसेच मडगाव पालिकेला कळविले होते. काही वर्षांपूर्वी मडगावात दिवसाढवळ्या स्वप्नील वाळके या सराफाचा गोळ्या घालून खून करण्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्हीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता.
त्यावेळी चर्चा होऊन नादुरुस्त कॅमरे सुरू करण्याबरोबर नवीन कॅमरे बसविण्याबद्दल पालिका मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली होती. पण नंतर काही हालचाली दिसून आल्या नाहीत. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांकडे यासंदर्भात विचारणा केली असता वाहतूक खात्याकडून सीसीटीव्हीसंदर्भात पत्रव्यवहार झाला असून पालिका सीसीटीव्ही कॅमेऱयांसाठी ‘सीएसआर’च्या अंतर्गत कोणी पुरस्कर्ता मिळतो काय याच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी वा काही ठिकाणी नव्याने कॅमेरे बसविण्यासाठी पालिकेकडे निधी नाही काय ? पालिका कोटय़वधी रुपये कचरा संकलनाच्या नावाखाली उधळत असते, तर मग कॅमेरे बसविण्यासाठी पालिका पुरस्कर्त्याची वाट का पाहत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया एका मडगाववासियाने व्यक्त केली.