Tarun Bharat

विरोधकांतर्फे मार्गारेट अल्वांना उमेदवारी

Advertisements

उपराष्ट्रपतीपद निवडणूक ः शरद पवारांनी केली घोषणा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित एनडीएचा उमेदवार जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षांनीही रविवारी आपला उमेदवार जाहीर केला. मार्गारेट अल्वा या विरोधी पक्षाच्या उमेदवार असतील, अशी घोषणा रविवारी करण्यात आली.   राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, माकप नेते सीताराम येच्युरी, शिवसेना नेते संजय राऊत आदी उपस्थित होते. यावेळी संसद अधिवेशनातील विरोधी पक्षांच्या रणनीतीवरही चर्चा करण्यात आली.

उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा निर्णय घेण्यासाठी विरोधकांचीही रविवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत महिला नेत्या मार्गारेट अल्वा यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. 80 वषीय मार्गारेट अल्वा मूळच्या कर्नाटकमधील रहिवासी आहेत. 1974 ते 1998 आणि 1999 ते 2004 या काळात त्या राज्यसभेच्या सदस्या होत्या. अल्वा यांनी राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले होते. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संसदीय कार्य आणि युवक कल्याण मंत्रालयांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. तर नरसिंहराव सरकारमध्येही त्यांनी मंत्रिपद भूषवले होते.

30 वर्षांच्या आपल्या राज्यसभा सदस्यत्वाच्या कारकिर्दीत मार्गारेट अल्वा यांनी विविध संसदीय समित्यांवरही काम केले. 1999 ते 2004 पर्यंत त्या महिला सशक्तीकरण संबंधित संसदीय समितीच्या सभापती होत्या. तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध परिषदांमध्येही त्यांनी भारताचे नेतृत्त्व केले आहे. 1986 मध्ये युनिसेफ एशियाच्या आणि सार्क देशांच्या मंत्रिस्तरीय बैठकीत त्या सहभगी झाल्या होत्या.

4 राज्यांच्या राज्यपालपदाची धुरा

मार्गारेट अल्वा यांनी उत्तराखंड, राजस्थान, गोवा आणि गुजरातचे राज्यपालपदही सांभाळले होते. उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. 2009 ते 2012 या काळात त्या उत्तराखंडच्या राज्यपाल होत्या. तसेच 2012 ते 2014 या काळात त्या राजस्थानच्या राज्यपालपदीही राहिल्या आहेत. याच काळात त्यांच्याकडे गुजरात आणि गोवा या राज्यांचा प्रभारही सोपवण्यात आला होता.

गांधी परिवाराशी निकटचे संबंध

2008 साली विधानसभा निवडणुकांच्या काळात अल्वा यांनी काँग्रेस हायकमांडवर तिकिटे विकत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांना महासचिव पदावरून हटवले होते. अल्वा त्यावेळी महाराष्ट्र, मिझोरम, पंजाब आणि हरियाणाच्या प्रभारी होत्या. गांधी परिवाराशी निकटचे संबंध असल्यामुळे नंतर त्यांना उत्तराखंडच्या राज्यपालपदी संधी मिळाली होती.

6 ऑगस्ट रोजी मतदान-निकाल

भाजपने शनिवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित केले. 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान पार पडल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

उमेदवारी हा माझा मोठा गौरव ः अल्वा

मार्गारेट अल्वा यांनी ट्विट करून आपल्या या उमेदवारीबाबत विरोधी पक्षांचे आभार मानले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मिळालेली उमेदवारी हा गौरव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच आपण ही उमेदवारी स्वीकारत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्याला संधी दिल्याबद्दल सर्व विरोधी पक्षांचे त्यांनी आभारही मानले आहेत.

Related Stories

हॉटस्पॉटमधील एक-तृतीयांश लोकसंख्या कोरोनामुक्त

Patil_p

हरियाणात शेतकऱ्यांचे ‘टोल फ्री’ आंदोलन

datta jadhav

बेरोजगारीच्या मुद्दय़ावरून राहुल गांधी मोदींवर बरसले

Patil_p

राजपथावर दिमाखदार रंगीत तालीम

Patil_p

मुरघा मठाधीशांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

Patil_p

उत्तराखंडात जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar
error: Content is protected !!