वार्ताहर /जुने गोवे
कोरोना काळात चोडण येथील नागरिकांना मदत करण्यासाठी सुरू केलेल्या ‘हेल्पिंग हॅण्ड्स ऑफ चोडण’ या व्हॉट्सऍप ग्रुपतर्फे रविवार दि. 15 रोजी चोडण येथील साऊद चर्चजवळ ‘चोडणेचो बाजार’ भरविण्याचे ठरविण्यात आले आहे.
चोडणचे रहिवासी अनेक प्रकारची पिके घेतात. उदा. भात, विविध पालेभाज्या, वाल, अळसांदे, चवळी, मिरची, कोकम सोले, आंब्याची सोले तसेच चोडण भागातील महिला स्वयंसाहाय्य गटातर्फे लाडू, चकली, चिवडा, फरसाण, पापड, लोणचे आदी खाद्यपदार्थ, विणकाम, भरतकाम, शिवणकाम केलेल्या वस्तू तयार करण्यात येतात. ताजी गावठी मासळीही येथे उपलब्ध होते. पण या सर्व वस्तू विक्रीसाठी पणजी, म्हापसा, डिचोली, अस्नोडा व इतर ठिकाणी न्याव्या लागतात.
चोडणमध्ये तयार होणारे खाद्यपदार्थ, धान्य व इतर वस्तू त्या तयार केलेल्यांना एकाच ठिकाणी विकता याव्या व गरजू नागरिकांना एकाच ठिकाणी विकत घेता याव्या, या उद्देशाने हेल्पिंग हॅण्ड्स या स्वयंसेवी संस्थेने चोडणेचो बाजार भरविण्याचे ठरविले आहे.
हेल्पिंग हॅण्ड्स ऑफ चोडण’ ही संस्था एक व्हॉट्सऍप ग्रुप असून सरकार दरबारी एक स्वयंसेवी संस्था म्हणून नोंदणी झाली आहे. ही योजना यशस्वी झाल्यास व चोडणच्या नागरिकांच्या पसंतीस उतरल्यास ‘चोडणेचो बाजार’ साप्ताहिक वा पाक्षिक भरविण्याचा विचार संस्था करेल, असे संस्थेच्या निमंत्रकांनी सांगितले आहे.