वार्ताहर /अगसगे
बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीच्या चुरशीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे दयानंद भरमू पाटील यांनी बाजी मारली. यामुळे हंदिगनूर परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला.
तालुका मार्केटिंग सोसायटीचे सदस्य प्रमोद पाटील यांचे निधन झाले होते. यामुळे एक जागा रिक्त झाली होती. या एका जागेसाठी पोटनिवडणूक रविवार दि. 29 मे रोजी घोषित करण्यात आली होती. एका जागेसाठी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामधील चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. हंदिगनूर प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीचे अध्यक्ष दयानंद भरमू पाटील यांनी काँग्रेस पक्षामधून अर्ज भरला. भाजपमधून हेमंत पुंडलिक पाटील यांनी निवडणूक लढविली. यावेळी काँग्रेस आणि भाजप अशी निवडणूक झाली. रविवार दि. 29 मे रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार दयानंद भरमू पाटील यांना 60 पैकी 40 मते पडली. यामुळे त्यांनी भरघोस मतांनी विजय मिळविला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष व्यक्त केला. यमकनमर्डीचे आमदार आणि केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या आशीर्वादाने भरघोस मतांनी विजयी झालो असल्याची प्रतिक्रिया दयानंद पाटील यांनी केली. काँग्रेसचे दयानंद पाटील यांना निवडून आणण्यासाठी केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, यमकनमर्डी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष रामा गुळी, राजू अंकलगी, हंदिगनूर, ग्रा. पं. माजी उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील यांनी परिश्रम घेतले.