नरकासूर प्रतिमा करण्याच्या कामाला जोर : पणत्या, आकाशकंदील, दिव्यांची रेलचेल दुकानांमधून फराळ, मिठाई, भेटवस्तू उपलब्ध
प्रतिनिधी /पणजी
येत्या 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळपासून सुरू होणाऱया दिवाळी उत्सवाच्या स्वागतासाठी गोव्यात तयारी सुरू झाली आहे. दिवाळी उत्सवाचे गोव्यातील खास आकर्षण ठरलेल्या नरकासूर प्रतिमा निर्माण करण्यास प्रारंभ झाला आहे. राज्यातील बाजारपेठांमध्ये सुका मेवा व आकर्षक भेटवस्तूही विक्रीसाठी आल्या आहेत.
गोव्यात दिवाळी उत्सवाला रविवार दि. 23 रोजी सायंकाळी प्रारंभ होईल. दि. 24 रोजी पहाटे नरकारसूर वध व त्याच दिवशी सायंकाळी लक्ष्मीपूजन होणार आहे. दि. 26 रोजी दिवाळी पाडवा आणि भाऊबीज देखील होणार आहे.
धुमधडाक्यात होणार दिवाळी
गेली 2 वर्षे कोरोनामुळे राज्यात सार्वजनिक दिवाळी उत्सव होऊ शकले नाहीत. यावर्षी मात्र दिवाळी उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. गोव्यातील दिवाळीचे खास वैशिष्टय़ ठरलेल्या नरकासूर प्रतिमा तयार करण्याच्या कामाला जोरात प्रारंभ झाला आहे. दरवर्षी नरकासूर प्रतिमांची स्पर्धा संपूर्ण गोव्यात होत असे. गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या. यावर्षी दिवाळी उत्सवाला उधाण आलेले आहे. अनेक गावांमध्ये नरकासूर प्रतिमा स्पर्धा तसेच आकाशकंदील व रांगोळी स्पर्धा देखील होणार आहेत.
आकर्षक बक्षिसे
गेल्या दोन वर्षात सार्वजनिक दिवाळी होऊच शकली नाही. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत नरकासूर, आकाशकंदील, रांगोळी व अन्य स्पर्धांसाठी भव्य बक्षिसे देण्यासाठी विविध संस्थांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. राज्यात यंदा दिवाळी उत्सवाची धूम पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.
बाजारपेठा सजू लागल्या
रविवार 23 रोजी सायंकाळपासून सुरू होणाऱया दिवाळी उत्सवासाठी आवश्यक लागणाऱया साहित्याने राज्यातील बाजारपेठा सजू लागल्या आहेत. अनेक मिठाईची दुकाने आकर्षक बॉक्स तसेच विविधांगी मिठाईने गच्च भरलेली आहेत. दिवाळीत एकमेकाला मिठाईबरोबरच सुका मेवा दिला जात असल्याने राज्यातील बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचा सुका मेवा तसेच ते सजविण्यासाठी आकर्षक पेटय़ाही मिठाईवाल्यांच्या दुकानात सज्ज झालेल्या आहेत.
… तरीही काजूला मागणी
महागाईने कहर केला असला तरी देखील काजूला असलेली मागणी कमी झालेली नाही. दिवाळीत काजूच्या लाडूना बरीच मागणी असते. यंदाही मिठाईवाल्यांनी महागडे काजूचे लाडू विक्रीस उपलब्ध केलेले आहेत.
बाजारपेठांमध्ये आकर्षक आकशकंदील, पणत्या, आकर्षक दिवे आले असून खरेदीसाठी ग्राहकांची संख्या बाजारपेठांमध्ये वाढू लागली आहे. शिवाय सध्या गावागावांमध्ये व शहरातील नाक्या-नाक्यावर भव्य नरकासूर प्रतिमा तयार करण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. रात्री उशिरापर्यंत युवावर्ग जागरण करुन नरकासुराच्या अक्राळविक्राळ प्रतिमा तयार करण्याचे काम करत असल्याचे दिसत आहे.