सेन्सेक्स 548 अंकांनी मजबूतः आयटी, बँकांचे समभाग वधारले
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतामुळे भारतीय भांडवली बाजारातील प्रमुख दोन सेन्सेक्सपैकी बीएसई व निफ्टी यांचे निर्देशांक बुधवारी 1 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाल्याचे पहावयास मिळाले. सोमवार, मंगळवारच्या सत्रात बाजार घसरणीत राहिला होता. विविध क्षेत्रांपैकी बुधवारच्या सत्रात माहिती तंत्रज्ञान व बँकांच्या समभागांच्या मजबुतीमुळे गेल्या दोन दिवसांमध्ये आलेल्या घसरणीला पूर्ण विराम मिळाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बुधवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 547.83 अंकांनी वधारुन निर्देशांक 55,816.32 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 157.95 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 16,641.80 वर बंद झाला आहे.
जागतिक पातळीवरील अन्य घडामोडींच्या प्रभावात आशियातील अन्य बाजारात दक्षिण कोरियाचा कॉस्पी व जपानचा निक्की हे लाभात राहिले असून चीनचा शांघाय कम्पोझिट व हाँगकाँगचा हँगसेंग हे घसरणीत राहिले आहेत.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीमुळे पहिले दोन दिवस तर घसरण सुरुच राहिली असून याच दरम्यान निफ्टी आशियातील क्षेत्रांमध्ये सर्वाधिक चांगली कामगिरी केलेली असल्याने निर्देशांक तेजीत राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.53 टक्क्यांनी वधारुन 105 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये सनफार्माचे समभाग सर्वाधिक 3.39 टक्क्यांनी वधारले असून यासह स्टेट बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो, एशियन पेन्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँक यांचे समभाग लाभासह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग मात्र 1.32 टक्क्यांनी नुकसानीत राहिले असल्याचे दिसून आले.