युक्रेनियन नागरिकांनी पाडले सोव्हियत स्मारक
रशिया-युक्रेन युद्धाला दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. या दोन महिन्यांदरम्यान दोन्ही देशांमध्ये शत्रुत्वाची भिंत निर्माण झाल्याने युक्रेनचे नागरिक आता रशियाशी संबंधित ऐतिहासिक गोष्टींना देखील स्वतःसोबत ठेवू इच्छित नाहीत. याचमुळे राजधानी कीव्हमधील रशिया आणि युक्रेनच्या मैत्रीचे प्रतीक असणारे सोव्हियत स्मारक तोडण्यात आले आहे.
रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. सद्यकाळात हे दोन्ही देश परस्परांचे सर्वात मोठे शत्रू ठरले आहेत. परंतु एकेकाळी याच दोन्ही देशांनी मिळून 45 वर्षांपर्यंत अमेरिकेच्या डिप्लोमसीला तोंड दिले होते. शीतयुद्ध सुरू झाल्यावर साम्यवादी विचारसरणी असणारी सोव्हियत आघाडी 1992 पर्यंत अमेरिकेसोबत शीतयुद्धात गुंतून राहिला. यादरम्यान रशिया आणि युक्रेनने महत्त्वपूर्ण भागीदारी केली. परंतु सोव्हियत महासंघाचे पतन होताच या संबंधांमध्ये अंतर आले.
दुसरे महायुद्ध संपल्यावर 1947 मध्ये जग भांडवलशाही आणि साम्यवाद या दोन्ही हिस्स्यांमध्ये विभागले गेले. भांडवलशाहीचे नेतृत्व अमेरिका करत होता, तर साम्यवादाची धुरा सोव्हियत महासंघाच्या हातात होती. याचसोबत दोन्ही गटांमध्ये एकप्रकारे अघोषित युद्ध सुरू झाले, ज्याला शीतयुद्ध म्हणून ओळखले गेले. या शीतयुद्धात अमेरिकेच्या मुख्य सहकाऱयांमध्ये फ्रान्स, ब्रिटन आणि पश्चिम जर्मनीचा समावेश होता. तर सोव्हियत महासंघात रशिया, युक्रेन, हंगेरी आणि पूर्व जर्मनीचा प्रामुख्याने समावेश होतो. 45 वर्षांपर्यंत चाललेल्या या शीतयुद्धात रशिया आणि युक्रेनने राजनयिक, सैन्य आणि सांस्कृतिक दृष्टय़ा महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती.
1992 मध्ये सोव्हियत महासंघाचे पतन झाल्यावर रशिया आणि युक्रेनच्या संबंधांमध्ये कटूता येऊ लागली. 2022 पर्यंत ही कटूता इतकी वाढली की रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर युद्धच लादले.