चकित करणारी कुटुंबाची कहाणी
दोन जुळय़ा भावांचा दोन जुळय़ा बहिणींशी विवाह झाल्याचे आणि त्यानंतर जवळपास एकाचसमयी त्यांना अपत्य झाल्याचे सांगण्यात आल्यास प्रथमदर्शनी तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु खरोखरच असे घडले आहे. व्हर्जिनियात राहणाऱया जुळय़ा बहिणी ब्रियाना आणि ब्रिटनी डीन (35 वर्षे) यांनी दोन जुळे भाऊ जॉश आणि जेरमी यांच्याशी विवाह केला आहे. दोन्ही जोडप्यांना प्रत्येकी एक मुलगा असून त्यांची जॅक्स अन् जेट अशी नावे आहेत.
दोन जुळय़ा आई अन् जुळय़ा पित्यांद्वारे जन्माला आलेल्या मुलांना ‘क्वाटर्नरी ट्विन्स’ म्हटले जाते. पूर्ण जगात अशाप्रकारची सुमारे 300 कुटुंबं आहेत. ब्रिटनीने जॉशसोबत विवाह केला असून त्यांना जेट नावाचा मुलगा आहे. मुलांची ही अनोखी परिस्थिती आहे आणि यामुळे इतरांपेक्षा नात्यांमध्ये अधिक जवळ आहोत असे ब्रिटनीने म्हटले आहे. हे कुटुंब इन्स्टाग्रामवर अत्यंत प्रसिद्ध आहे.
जुळय़ा लोकांच्या पार्टीत भेट
आम्ही दोन्ही मुलांना एकत्रच वाढवत आहोत, जेणेकरून ते एका कुटुंबाप्रमाणे रहावेत असे जेरमी यांनी म्हटले आहे. जुळय़ा बहिणींची जुळय़ा भावांशी 2017 मध्ये एका पार्टीदरम्यान भेट झाली होती. ही पार्टी केवळ जुळय़ा लोकांसाठी आयोजित करण्यात आली होती. दोन्ही भावांनी 6 महिन्यांनी या जुळय़ा बहिणींशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.
घेतली होती शपथ
जोडप्यांचा विवाह कुणाचेही लक्ष वेधून घेण्यास पुरेसा होता. कारण यात 15 जुळे भावंडं सामील झाली होती. त्यांचा विवाहसोहळा टीव्हीवर प्रसारित करण्यात आला होता. दोन्ही भाऊ अन् बहिणींनी विवाहसोहळय़ात एकसारखेच कपडे घातले होते. जुळय़ा बहिणींशीच विवाह करणार असल्याची शपथ जेरेमी आणि जॉश यांनी घेतली होती.