वार्ताहर /शिवोली
गोवामुक्ती संग्रामात क्रांतिवीरांबरोबर त्यांच्या परिवाराला देखील असंख्य संकटांना सामोरे जावे लागले. त्या सर्वांच्या त्याग आणि बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत. बाळा राया मापारी, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचा परिवार यांच्या कार्याची दखल इतिहासात घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुकुंदराज महाराज यांनी केले.
गोवामुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा बाळा राया मापारी यांची कन्या तथा शिवोली येथील पहिले हुतात्मा येशी आगरवाडेकर यांच्या घरातील सून श्रीमती लक्ष्मी आगरवाडेकर यांचा सन्मान दांडा शिवोली येथील सद्गुरु जीवनमुक्त महाराज मठाच्या शिवसागर प्रांगणावर झाला, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर गोवा विद्यापीठाचे डॉ. विनय मडगावकर, जीवनमुक्त महाराजांचे शिष्य तथा आजाद गोमंतक दलाचे सक्रिय सदस्य नारायण शिरोडकर यांची पत्नी लक्ष्मी शिरोडकर, जीवनमुक्त महाराजांचे संयोगी क्रांतिवीर सुखा शिरोडकर यांचे पुतणे नरेश शिरोडकर, महेश ताम्हणकर, कमलाकांत कोरगावकर, रितेश आगरवाडेकर हे मान्यवर उपस्थित होते. भक्तिज्ञानमार्ग साधन संस्था शिवोली आणि श्रीआदिशक्ती महिला कला केंद्र शिवोली यांच्या संयुक्त विद्यमाने गोवामुक्ती दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गोवामुक्ती संग्रामात पूजनीय सद्गुरु जीवनमुक्त महाराज यांच्यासारखे धर्मगुरू, त्यांचा शिष्य परिवार सक्रियपणे सहभागी झाला होता. पोर्तुगीजांना आव्हान देत, गोमंतकीय जनतेला देवभक्ती बरोबर देशभक्तीचा संदेश पूजनीय जीवनमुक्त महाराजांनी दिला होता. जीवनमुक्त महाराजांच्या कीर्तनातून प्रेरणा घेऊन नारायण शिरोडकर आणि यशवंत मडगावकर हे शिष्य, सशस्त्र क्रांती करायला प्रवृत्त झाले होते. बाळा राया मापारी, बाळा देसाई आणि बापू गवस यांच्या हौतात्म्याला अभिवादन करणारी अभंगरचना पूजनीय जीवनमुक्त महाराजांनी रचली होती. सखाराम बर्वे लिखित ’जळता गोमंतक’ या नाटकांमधून तसेच डॉ. प्रकाश वझरीकर यांच्या ’होमखांण’ या नाटकामधून बाळा राया मापारी यांची गौरवगाथा आविष्कृत होणे, आदर्शवत असल्याचे प्रतिपादन डॉ. विनय मडगावकर यांनी केले.
पूजनीय मुकुंदराज महाराज यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. तिरंगा ध्वजाला मानवंदना देऊन सर्वांनी बाळा राया मापारी यांना श्रद्धा?जली अर्पण केली. तदनंतर बाळा राया मापारी यांची कन्या श्रीमती लक्ष्मी आगरवाडेकर यांना मुकुंदराज महाराज यांच्या हस्ते शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या वेळी कौशल पत्की यांच्या गोमंतकीय स्वातंत्र्यसैनिकावर आधारित व्हिडिओ डॉक्मयुमेंटरीच्या संदर्भात माहिती देण्यात आली. कमलाकांत कोरगावकर यांनी स्वागत केले, तर जया मडगावकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.