सातारा : सैनिकी परंपरा लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील अपशिंगे मिलिटरी गावचे सुपूत्र सुधीर सूर्यकांत निकम यांचे कर्तव्य बजावत असताना मंगळवारी निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (Martyr Sudhir Nikam was cremated in a military crematorium) सातारा पोलिसांच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. ‘भारत माता की जय, वीर जवान अमर रहे’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
निकम हे गुजरात जामनगर येथे सेवा बजावत होते. त्यांना शारीरिक त्रास जाणवू लागल्याने अधिक उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असताना त्यांची प्रकृती खालवली. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. 8 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत असणाऱ्या वीर जवान सुधीर निकम यांच्यावर आज सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या गाडीतून अंत्ययात्रा गावातून काढण्यात आली. विजय स्तंभ येथे मिलिटरी परेड होऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सुधीर निकम यांचे वडील सूर्यकांत निकम यांना देखील 1995 मध्ये सिक्कीम येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे.