8 डिसेंबर ते 12 जानेवारी 2023 मधील उत्पादीत कार्सचा समावेश ः एअरबॅग कंट्रोलर्समध्ये आढळला दोष
नवी दिल्ली ः भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने सदोष एअरबॅग कंट्रोलरमुळे जवळपास 17,362 वाहने परत मागवली आहेत. एक्सचेंज फाइलिंगनुसार, या प्रभावित कार मॉडेल्समध्ये 8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान उत्पादित करण्यात आलेल्या कारपैकी आल्टो के10, एस प्रेसो, ग्रॅड विटारा, इको, ब्रिझा आणि बलेनो या कार्सचा समावेश राहणार आहे.
कंपनीने एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे, गाडीत असणाऱया एअरबॅगबाबत दोष आढळला आहे. कंपनीने ग्राहकांना सदोष भाग बदलेपर्यंत वाहन न चालवण्याचा सल्ला दिला आहे. मारुती सुझुकीच्या अधिकृत केंद्रे बाधित वाहन मालकांशी संपर्क साधतील आणि भाग विनामूल्य बदलून देण्यात येणार असल्याचेही यावेळी कंपनीने स्पष्ट केले आहे.
देशात वाहने परत मागवण्याची प्रकरणे
1. बलेनो आणि वॅगनआर ः जुलै 2020 मध्ये, मारुतीने वॅगनआर आणि बलेनोच्या 1,34,885 युनिट्स परत मागवल्या. ही मॉडेल्स 15 नोव्हेंबर 2018 ते 15 ऑक्टोबर 2019 दरम्यान तयार करण्यात आली होती.
2. मारुती इको ः नोव्हेंबर 2020 मध्ये, कंपनीने इकोच्या 40,453 युनिट्स परत मागवल्या होत्या. वाहनाच्या हेडलॅम्पवर मानक चिन्ह नसल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला होता. 4 नोव्हेंबर 2019 ते 25 फेब्रुवारी 2020 दरम्यान सदरची वाहने उत्पादित केलेली होती.
3. महिंद्रा पिकअप ः 2021 मध्ये, महिंद्रा अँड महिंद्राने त्यांच्या व्यावसायिक पिकअप वाहनांची 29,878 युनिट्स परत मागवली. जानेवारी 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान उत्पादित काही पिकअप वाहनांमध्ये फ्लुइड पाईप बदलण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले होते.
4. महिंद्रा थार ः महिंद्रा अँड महिंद्राने फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांच्या ऑफरोड एसयूव्ही थारच्या डिझेल प्रकारातील 1577 युनिट्स परत मागवल्या होत्या. कंपनीने सांगितले होते की प्लांटच्या मशीनमध्ये बिघाड होती. सर्व युनिटचे उत्पादन 7 सप्टेंबर ते 25 डिसेंबर 2020 दरम्यान करण्यात आले होते.
5. रॉयल एनफिल्ड ः मे 2021 मध्ये, रॉयल एनफिल्डने शॉर्ट सर्किटच्या शक्यतेमुळे बुलेट 350, क्लासिक 350 आणि मेटियर 350 ची 2,36,966 युनिट्स परत मागवली. ही वाहने डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 दरम्यान तयार करण्यात आली होती.
गेल्या वर्षीही गाडय़ा परत मागविल्या
यापूर्वी, कंपनीने 2 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान उत्पादित एकूण 9,125 वाहने परत मागवली होती. या मॉडेल्समध्ये सियाझ, बेझा, इर्टीगा, एक्सएल6 व ग्रॅड विटारा यांचा समावेश होता. मागच्या वर्षी मारुती सुझुकी इंडियानेही त्यांच्या तीन मॉडेल्स वॅगन आर, सेलेरियो आदीच्या 9,925 युनिट्स परत मागवल्या होत्या. ही वाहने 3 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2022 दरम्यान तयार करण्यात आली होती.