कंपनीचे दरवर्षी 20 हजार कार्स जगभरात निर्यात करण्याचे ध्येय ः पाच वर्षांसाठी करार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने तामिळनाडूमधील कामराजर बंदरासोबत आपल्या कारची जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी करार केला आहे. हा करार पाच वर्षांसाठी आहे.
सदरच्या बंदराचा वापर हा आफ्रिका, मध्यपूर्व, लॅटिन अमेरिका, आसियान, ओशनिया आणि सार्क प्रदेशात कार निर्यात करण्यासाठी केला जाईल. भारतातील सर्वात मोठय़ा कार उत्पादक कंपनीने जाहिर केले आहे, की या बंदरातून दरवर्षी 20 हजार वाहनांची निर्यात करणार आहे. निर्यातीसाठी कंपनीचे देशातील हे चौथे बंदर आहे. सध्या मारुती सुझुकी मुंबई, मुंद्रा आणि पिपावाव बंदरातून आपल्या गाडय़ा परदेशात निर्यात करत आहे.
जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत
मारुतीचे सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिसाशी ताकेउची यावेळी म्हणाले, ‘कंपनी मेक इन इंडिया उपक्रमाला समर्पित आहे. आमच्या विस्तारित निर्यात ऑपरेशन्सवरून हे दिसून येते की आम्ही जागतिक ग्राहकांसाठी विश्वसनीय, उच्च दर्जाच्या आणि प्रगत कार बनविण्यासाठी वचनबद्ध आहोत.’
भव्य पार्केंग सुविधा
कामराजर बंदरचे सीएमडी सुनील पालीवाल म्हणाले, की ‘मारुती सुझुकीच्या बंदराशी केलेल्या करारामुळे आम्हाला आमचे कामकाज वाढविण्यास मोठी मदत होणार आहे. यासोबत आम्ही भारताच्या अर्थव्यवस्थेत चांगले योगदानही देऊ शकू. जवळपास बंदरात 14 हजार गाडय़ांसाठी पार्किंगची जागा उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी पालीवाल यांनी दिली.’